भाईंदर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गुरुवारी मिरा-भाईंदर भाजपच्या दोन गटात एका बैठकी दरम्यान तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीची चित्रफीत समाज माध्यमावर पसरू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मीरा भाईंदर मधील भाजप पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक प्रदेश गुरुवारी कार्यकारणीने बोलावली होती. या बैठकीला मिरा भाईंदर भाजपचे प्रभारी जे. पी ठाकूर उपस्थितीत राहणार होते.  गुरुवारी संध्याकाळी मिरा रोडच्या गोल्डन नेस्ट येथील ब्लु मुन क्लब येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार नरेंद्र मेहता व रवी व्यास यांच्या गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा >>> वस‌ईच्या औद्योगिक वसाहतीत भीषण आग; औद्योगिक कचऱ्यामुळे आग लागल्याचा शक्यता

यावेळी कार्यक्रमात रवी व्यास यांना सन्मान न देता डावलल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले होते. काही वेळाने हे संतप्त कार्यकर्ते थेट मंचावर चढले. हे पाहून नरेंद्र मेहता समर्थक देखील आक्रमक झाले. सुरुवातीला शाब्दिक वादाने सुरु झालेल्या हा वाद काही क्षणातच हाणामारीत रूपांतरित झाला. त्यामुळे जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी  मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु व्यास यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना देखील मारहाण केली.यामुळे दोन्ही गटातील वाद अजून चिघळला गेला आणि हाणामारी सुरू झाली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची चित्रफित  समाजमाध्यमावर व्हायरल झाली आहे. या प्रकारामुळे मीरा भाईंदरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मेहता आणि व्यास आगामी विधानसभा निवडणूक भाजप पक्षातून लढण्यास इच्छुक

मिरा भाईंदर भाजप पक्षात मागील तीन वर्षांपासून माजी आमदार नरेंद्र मेहता आणि रवी व्यास यांचे दोन उभे गट पडले आहे. यामध्ये मेहता आणि व्यास हे दोघे देखील आगामी विधानसभा निवडणूक भाजप पक्षातून लढण्यास इच्छुक आहेत. यात मेहता यांच्या पाठीशी माजी नगरसेवकांची मोठी फौज असून जिल्हाध्यक्ष देखील त्यांचे समर्थक आहेत. तर व्यास यांनी  देखील मध्यल्या काळात काही नगरसेवकांचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवून आपली ताकद वाढवली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two groups of bjp leaders clash during meeting in mira bhayandar video spreading on social media zws