वसई: वसईच्या चुळणे गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन बहिणी घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मोलकरणीसह बेपत्ता झाल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून या मुलींचा शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा >>> वसई, भाईंदर मध्ये २०२३ मध्ये एकूण ३७ हत्या; नालासोपारा येथील महिलेच्या हत्येचे गूढ कायम
वसईच्या चुळणे गावात या दोन बहिणी राहत होत्या. मोठी मुलगी १५ वर्षाची तर लहान मुलगी १२ वर्षांची आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पालकांनी घरकाम करण्यासाठी रत्नागिरीतून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी आणले होते. या दोन्ही बहिणींच्या देखभालीचे काम तिच्याकडे होते. बुधवारी सकाळी मुलीच्या आईने त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला असता दोन्ही मुली तसेच घरकाम करणारी मुलगी बेपत्ता होती. सर्वत्र शोध घेतल्यानंतर माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. तिन्ही मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून या मुलींचा शोध सुरू आहे. दरम्यान मुलीच्या शोधासाठी पालकांनी समाज माध्यमांवरून छायाचित्र प्रसारित करून माहिती देण्याचे आवाहन केले आहे.