लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावर शनिवारी रात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत विरार फाटा येथे तरुणांच्या गटातील एका दुचाकीचा दुभाजलाका धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एक तरुण ठार झाला तर दुसरा जखमी झाला. दुसर्या अपघातात भालीवली येथे ट्रक आणि ट्रेलरच्या धडकेत ट्रकचालकाचा मृत्यू झाला.
विरार पूर्वेच्या मनवेला पाडा येथे राहणारे तरुण शनिवारी रात्री मुंबई महामार्गावरील विरार फाट्यावर असलेल्या ढाब्यावर जेवणााठी जात होते. एकूण ६ जण तीन दुचाकीवर निघाले होते. आदर्श तांबे (२५) याच्या दुचाकीच्या (एमएच ४८ सीडी ८०२०) मागे रोहीत यन्नवार (२३) हा तरूण बसला होता. मध्यरात्री दिडच्या सुमारास महामार्गावरील बरफ पाडा गावाच्या हद्दीत मंगल कार्यालयासमोर सुमारास आदर्शचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात दोघे खाली फेकले गेले.
मागे बसलेल्या रोहितच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आदर्शही जखमी झाली. उपचारासाठी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रोहितचा मृत्यू झाला. आदर्श हा रेल्वेत काम करत होता तर मयत रोहित हा खासगी कंपनीत कामाला होता. आम्ही सर्व मित्र एकाच परिसरात राहतो. आमच्या पुढे आदर्शची दुचाकी होती. पण अचानक दुभाजकाला धडक लागली आणि दोघे खाली पडले असे गौरव सोनावणे याने सांगितले.
आदर्श भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याने नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. त्यामुळे विरार पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) २८१, १२५ (ए) १२५ (बी) तसेच मोटार वाहतूक कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या आदर्शवर मुंबईतील रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ट्रक आणि ट्रेलरचा अपघात
दुसरी घटना महामार्गावरील भालीवली गावाच्या हद्दीत घडली. रात्री गुजरातकडे जाणार्या मार्गावर एक ट्रक (एमएछ ४६ बीयू २६९१) हा नादुरूस्त झाला होता. चालक नसीर खान (४५) याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला. मात्र तो उभा करताना सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली नव्हती. रात्री साडेनऊच्या सुमारास मागून येणार्या एका ट्रेलरने ( एचआर ७३ ए ०३८८) जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचालक नासीर खान याचा मृत्यू झाला तर ट्रेलर चालक शमीम मोहम्मद हा जखमी झाला आहे. याप्ररकणी मांडवी पोलिसांनी मयत ट्रकचालक याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६ (१) २८१, १२५ (ए) १२५ (बी) तसेच मोटार वाहतूक कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.