लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : भुईगाव समुद्रात अडकलेल्या दोन तरुणांची जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. सुमारे दिड तास हे बचाव मोहीम सुरू होती.
वसई पश्चिमेला असलेल्या समुद्रकिनार्यावर पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. भुईगाव येथील समुद्रकिनार्यावर प्रशांत राणा आणि दिव्यांश शर्मा हे दोन तरुण असेच फिरण्यासाठी आले होते. ते नालासोपारा येथे राहणारे आहेत. गप्पा मारत ते खोल पाण्यातील समुद्रात असलेल्या खडकावर गेले. मात्र संध्याकाळी भरती आल्याने ते पाण्यातच अडकले.
त्यांनी मदतीसाठी धावा सुरू केला. त्यावेळी जीवरक्षक हितेश तांडेल यांनी गावातील दोन तरुणांना सोबत घेतले आणि जीव धोक्यात घालून पाण्यात उतरले. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला देखील पाचारण करण्यात आले. रात्रीचा अंधार आणि पाण्याची पातळी वाढल्याने बचाव कार्यासाठी अडथळे निर्माण होत होते. मात्र जीवरक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढले.
दोन्ही मुले सुखरूप असून त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. समुद्रात जाणे धोकादायक असून पर्यटनाचा आनंद घेताना नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षख बाळकृष्ण घाडीगावकर यांनी दिली.