वसई- होळी उत्सव बघून दुचाकीवरून परतणार्या दोन तरूणांचा महामार्गावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भारोळ गावाजवळ हा अपघात झाला. दुचाकी वेगात असल्याने नियंत्रण सुटून दुभाजकावर आढळून हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
विरार पूर्वेच्या सायवन गावात प्रल्हाद माळी (२४) आणि त्याचा भाचा मनोज जोगारे (२०) हे तरूण रहात होते. पालघर जिल्ह्यातील मनोर जवळील ढेकाळे हे त्यांचे मूळ गाव आहे. गावात होळीचा मोठा उत्सव असतो. तो बघण्यासाठी प्रल्हाद आणि मनोज हे दोघे दुचाकीवरून गेले होते. शुक्रवारी सकाळी ते मनोरवरून महामार्गावरून दुचाकीने येत होते. मात्र त्यांची दुचाकी वेगात होती.
सकाळी ८ च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील भारोळ गावच्या हद्दीत दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि दुचाकीने दुभाजकाला धडक दिली. या भीषण अपघातात दोघे दूरवर फेकले गेले. दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी मयत दुचाकीचालक प्रल्हाद माळी याच्याविरोधात कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) सह मोटार वाहतूक कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणांच्या मृत्यूमुळे सायवन गावावर शोककळा पसरली आहे.