भाईंदर : मिरा भाईंदर शहरात खासगी कंपन्यांतर्फे अनधिकृतपणे बोअरवेल तयार करण्यात आल्या असून त्याद्वारे पाण्यााचा बेसुमार उपसा करण्यात येत आहे. यामुळे शहरातील भूजल पातळी खालवील आहे. मिरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण आणि एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होतो. प्रत्यक्ष शहराची पाण्याची गरज ही याहून अधिक आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करून शहरासाठी पालघरच्या सूर्या धरणातून २१८ दश लक्ष लीटर पाणी पुरवठा शासनाने मंजूर केला आहे. त्यानुसार यासाठी जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरु आहे. सध्या अधिक पाण्याची गरज भासत असल्यामुळे नागरिक खासगी स्वरूपात मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत. पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी विकणाऱ्या अनेक बेकायदेशीर कंपन्या शहरात सक्रीय झाल्या आहेत.

शहरात नैसर्गिक स्रोत असलेल्या पाण्याच्या ठिकाणी अनेकांनी बेकायदेशीरपणे बोरवेल तयार करण्यात आल्या आहेत. त्यातून भुजलातील पाणी मोठ्या प्रमाणात उपासले जात आहे. त्याचा परिणाम विहीरी आणि तलावांवर होत असून त्यातील पाणी आटू लागले आहे. मिरा भाईंदर शहरात अनधिकृतपणे बोअरवेल तयार करून पाणी उपसणाऱ्यांची तक्रार अनेकांनी महापालिका दरबारीं दिली आहे. त्यानुसार महापालिकेने सर्वेक्षण करून एकूण ६४ अनधिकृतपणे पाणी उपसा करणार्‍यांची यादी तयार केली आहे. असून कारवाईच्या दुष्टीने पावले उचलणार असल्याचा इशारा व्यवसायिकांना दिला आहे. भूजलातील नैसर्गिक स्रोतातून पाणी उपसणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे असतात. त्यामुळे ही यादी महापालिकेने प्रांत अधिकाऱ्यांकडे सोपावली आहे. त्यांच्याकडून कारवाईची प्रतीक्षा आहे.

कारवाईचे अधिकार देण्याची मागणी:-

नगरपरिषद प्रशासनाच्या जिल्हा सह आयुक्तांनी वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांना अवैध भुजल पाणी उपशावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.मात्र वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी या कारवाईचे अधिकार महाराष्ट्र भुजल ( विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ अंतर्गत कलम १७ मधील तरतुदीनुसार जिल्हा प्रांताधिकाऱ्यांना प्रदान केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.यात जिल्हा प्राधिकार्‍याकडून भुजल पाणी स्रोताच्या वापराकरिता ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.मात्र मिरा भाईंदर मधील खासगी पाणी स्त्रोताच्या मालकांकडून असे कोणतेही प्रमाणपत्र घेतले नसल्याची बाब आयुक्त राधा विनोद शर्मा यांच्या निदर्शनात आली आहे.त्यामुळे भुजल स्त्रोतातून पाणी उपसणाऱ्या व्यक्तीवर थेट कारवाई करण्याचे अधिकार देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधीकारी अशोक शिंगारे यांच्याकडे केली आहे.

विहिरीच्या संख्येत घट

मिरा भाईंदर शहरात जवळपास सार्वजनिक व खासगी अशा मिळून जुन्या ५०५ विहिरी नोंद आहे.यात ११५ सार्वजनिक आणि ३९३ खासगी विहिरी आहेत.मात्र आता समोर आलेल्या सर्वेक्षात केवळ ५४ सार्वजनिक व २२ विहिरी शिल्लक राहिल्या असून इतर विहिरी बेपत्ता झाल्याची माहिती पर्यावरण प्रेमी कडून देण्यात आली आहे.