भूमाफियांची नवी शक्कल; टाळेबंदीत सर्वाधिक अनधिकृत बांधकामात वाढ

भाईंदर: एकीकडे करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रशासनाकडून टाळेबंदी नियम लागू करण्यात येत असताना मिरा भाईंदर शहरात दुरुस्ती परवानगीच्या नावावर अनधिकृत बांधकामांचे प्रकार वाढले असल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अनेक विकासकांनी दुरुस्तीच्या परवानग्या घेऊन सर्रास अनधिकृत बांधकामांचा सपाटा लावला आहे. या संदर्भात पालिकेला अनेक बांधकामाची माहिती देऊनही पालिका कारवाईसाठी कानाडोळा करत असल्याने पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

मिरा भाईंदर शहरात करोना आजाराचा संसर्ग झपाटय़ाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यात दुसरी लाट अधिक प्रभावशाली असल्यामुळे प्रशासनाकडून कठोर टाळेबंदी नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे  शहरातील केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी देण्यात येत असून संपूर्ण लक्ष उपाययोजना राबविण्याकडे दिले जात आहे. पण याचा फायदा मात्र काही विकासकांनी उचलला आहे. दुरुस्ती परवानगीच्या नावावर चक्क अनधिकृत बांधकाम करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात भाईंदर पूर्व येथील नवघर भागात असलेल्या दोषी इंडस्ट्रीत गाळाच्या दुरुस्ती परवानगीच्या नावावर चक्क ३ हजाराहून अधिक चौरस फुटाचे अधिक बांधकाम करण्यात आल्याचे समोर आले आहे.  या संदर्भात रवींद्र जैन यांनी तक्रार  केली आहे. या बांधकामाची तक्रार प्रशासनाला प्राप्त झाली असून या संदर्भात अधिक माहिती घेऊन लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

नरेंद्र चव्हाण, अतिक्रमण विभाग प्रमुख.