लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई: नव्याने बांधण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर अवघ्या ३ महिन्यातच खड्डे पडल्याचे समजताच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगलेच संतापले आहेत. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना जाब विचारत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा (वरसावे) खाडीवरील पूलाशेजारी नवीन पूल बांधण्यात आला आहे. ४ मार्गिकेच्या या पुलावरील मुंबई-सुरत ही पहिली मार्गिका २८ मार्च रोजी सुरू करण्यात आली होती. मात्र अवघ्या तीन महिन्यातच नव्या वर्सोवा पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून ६८ ठिकाणी पुलावरील सळ्या बाहेर आल्या आहेत. परिणामी या पूलावर मोठी वाहतूक कोंडी होऊन अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

आणखी वाचा-नितीन देसाई आत्महत्या प्रकरण: पोलिसांकडून एडलवाईज ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस

या खड्डयांबाबत पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची दिल्लीत भेट घेऊन माहिती दिली. नव्या पूलावरील खड्डे आणि निकृष्ट काम पाहून गडकरी चांगलेच संतापले. त्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना फोन करून अवघ्या ३ महिन्यात खड्डे पडलेच कसे याचा जाब विचारला. याप्रकरणी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका आणि पुढची कामे देऊ नका, असे आदेश दिले. विकास कामे होत असताना त्यात गुणवत्तेबाबत अजिबात तडजोड होता कामा नये असेही गडकरी यांनी अधिकार्‍यांना सांगितले.

वर्सोवा पूलावरील खड्ड्यांप्रकरणी ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणी खासदार गावित यांनी केली होती. त्यानुसार एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक विजय मिस्त्री, एनजी प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीचे मालक अशोक थोरात तसेच आशिष शर्मा या ठेकेदारांवर नुकतेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Story img Loader