वसई- वसई विरार महापालिकेचे प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी करून त्यांच्या पत्नी संदर्भात आक्षेपार्ह संदेश पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश मनाळे हे वसई विरार महापालिकेचे प्रभारी आयुक्त आहेत. त्यांनी वसई विरार शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. त्यामुळे भूमाफिया हवालदिल झाले आहेत. त्यासाठी मनाळे यांना धमकाविण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
हेही वाचा >>> वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
अज्ञात व्यक्तींनी मनाळे यांचा छायाचित्रात फेरफार करून त्यांचे छायाचित्र अश्लील संकेतस्थळावर प्रसिध्द केले. ‘काव्या मेहता’ नावाच्या महिलेच्या बनावट फेसबुकवरून विविध व्हॉटसअपसमूहावर देखील प्रसारित करण्यात आले होते. यानंतर अज्ञात व्यक्तीने मनाळे यांना मोबाईलवर पत्नीबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेला संदेश पाठवून धमकी दिली. विशेष म्हणजे आरोपींनी मनाळे यांच्या मुळ लातूर गावातील व्हॉटसअप समूहावर हे बदनामीकारक मजकूर प्रसारीत करून त्यांचा मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा >>> ऑनलाईन जुगार हरल्याने झाला कर्जबाजारी, मिरा रोडमधील तरुण बनला चोर
नोव्हेंबर पासून हा प्रकार सुरू होता. अखेर रमेश मनाळे यांनी अज्ञात व्यक्ती आणि फेसबुक प्रोफाईलकर्त्याविरोधात बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून बोळींज पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३५१ (२), ३५६ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (सी) ६७ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला धमकावण्याचा प्रकार नाही. मात्र आता ते माझ्या कुटुंबाला लक्ष्य करत आहे. मात्र या भूमाफियांच्या दबावाला मी बळी पडणार नाही, असे प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले.