भाईंदर : उत्तन येथील पालिकेच्या घनकचरा प्रकल्पातील साचलेल्या कचऱ्याला गेल्या चाळीस दिवसापासून सतत आग लागत आहे. खबरदारी म्हणून दोन अग्निशमन गाडय़ा घटनास्थळीच तैनात ठेवण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे.
भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरात मिरा भाईंदर महापालिकेचा घनकचरा प्रकल्प आहे. काही वर्षांपूर्वी या प्रकल्पात कचऱ्यावरील प्रक्रिया ठप्प झाली असल्यामुळे सुमारे १४ लाख मेट्रिक टन इतका कचऱ्याचा डोंगर त्या ठिकाणी उभा राहिला आहे. ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० च्या सुमारास या कचऱ्याला अचानक आग लागली होती. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले. मात्र सलग बचाव कार्य सुरू ठेऊनही आगीवर नियंत्रण मिळवणे, पालिकेला अशक्य झाले होते. अखेर घटनेच्या तीन दिवसानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
ही आग कचऱ्यामध्ये निर्माण होणाऱ्या मिथेन गॅसमुळे लागली होती. वाहत्या वाऱ्याबरोबर ती वाढत असून ती कोणत्याही क्षणी पेट घेते. त्यामुळेच येथे अनेकदा आगी लागतात. बुधवारी पुन्हा या आगीने रौद्र रुप धारण केले होते. त्यामुळेच दुर्घटना घडू नये म्हणून एक अथवा दोन अग्निशमन गाडय़ा घनकचरा प्रकल्पस्थळी तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttan solid waste project fire again two fire trucks municipal bhainder west amy
Show comments