लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर : मीरा भाईंदर शहरात उन्हाचा पारा अधिकच वाढू लागला आहे. या उन्हामुळे उत्तन येथील महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला मागील आठवडाभरात सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या आगीच्या धुरामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण पसरू लागले आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरात मिरा भाईंदर महापालिकेची कचरा भूमी आहे. या कचरा भूमीवर शहरात गोळा होणारा कचरा आणून टाकला जात आहे. वाढत्या नागरिकरणामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण ही वाढू लागले आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया मागील काही वर्षापूवी ठप्प झाली आहे.
यामुळे सुमारे आठ लाख मॅट्रिक टन इतका कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. साचलेला कचरा पडून असल्याने आता कचराभूमीवर आगी लागण्याच्या घटना समोर येत आहेत. मागील आठवड्याभरात दोन दिवसा आड आग लागल्याचे समोर आले आहे. या लागलेल्या आगीवर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविले जाते. असे जरी असले तरीही या आगीच्या घटनामुळे उत्तन च्या वातावरणात मोठे प्रदूषण पसरू लागले आहे. येथील उष्णतेत मोठी वाढ होऊन याचा वाईट परिणाम शेती व मानवी आरोग्यावर होऊ लागला आहे.
रात्रीच्या सुमारास सुद्धा हवेत धुराचा थर दिसून येतो अशा वेळी घराबाहेर पडताना तो धूर नाका तोंडात जाऊन श्वसनाचे आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने घनकचरा प्रकल्पाचा प्रश्न कायमचा मार्गी लावावा म्हणून स्थानिक नागरिक एकवटले असून आंदोलना पवित्रा घेतला आहे.
गॅस निर्मितीमुळे आग
उत्तनच्या घनकचरा प्रकल्पावर साचलेला कचरा पडून आहे. त्या कचऱ्यात मिथेन गॅस वायू तयार होते. कडाक्याच्या उन्हात या गॅस पेट घेतो. या आगीला हवेची साथ मिळताचत्याचे रौद्ररूपात रूपांतर होत असते.
उपाययोजना अपयशी
उत्तन घन कचरा प्रकल्प स्थळी आग लागू नये म्हणून महापालिकेने आजवर बायोमायनींग, पाणी फवारणी आणि पावडर फवारणी सारख्या अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. यासाठी जवळपास कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु कोणताही सकारात्मक परिणाम दिसून आला नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. पालिकेने नागरी आरोग्याचा विचार करता याकडे लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिक करीत आहेत.