वसई : वसई-विरार महापालिकेने रेल्वे स्थानकात सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत याहे. या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत ३७ हजार ४४७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. वसई-विरार महापालिकेकडून सुरुवातीला शहरातील विविध ठिकाणच्या भागात लसीकरण करण्यास सुरवात केली होती. त्यापाठोपाठ आता पालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी कार्यक्षेत्रात येणाऱ्या वसई, विरार , नालासोपारा, नायगाव या स्थानकात १८ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. रेल्वे स्थानकातच लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत लसीकरण करण्यासाठी नेमलेल्या परिचारिका यांच्यामार्फत रेल्वे स्थानकात ये-जा करणारे प्रवासी आहेत त्यांचे लसीकरण केले जात आहे. अवघ्या महिना भराच्या कालावधीमध्ये ३७ हजार ४४६ जणांना लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यात १० हजार ४१६ जणांना लशीची पहिली मात्रा तर २७ हजार ३० जणांनी लशीची दुसरी मात्रा घेतली असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी दिलीआहे. पालिकेने रेल्वे स्थानकातच ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने काही नागरिक केंद्रावर न जाता आता थेट रेल्वे स्थानकात लसीकरण करवून घेऊ लागले आहेत.