पहिल्याच दिवशी १५९ विद्यार्थ्यांना लस
भाईंदर :उच्च शिक्षण घेण्याकरिता परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांंकरीता पालिका प्रशासनाकडून विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. यात पहिल्याच दिवशी १५९ विद्यार्थ्यांंचे लसीकरण पूर्ण झाले आल्यामुळे दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या अनेक विद्यार्थांना उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी परदेशीत जाण्याची गरज निर्माण झाली आहे.मात्र अशा विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसल्यामुळे परदेशात प्रवेश नाकारण्यात येत आहे.त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना लस उपलब्ध व्हावी म्हणून पालिका प्रशासनाकडून भाईंदर पश्विम येथील नगरभवन येथे १ जून आणि ५ जून अशा दोन दिवशी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.यात विद्यार्थ्यांंकडे परदेशीत जाण्याकरिता आवश्यक परदेशीं व्हिजा, विद्यालयातील प्रवेश निश्चित(१५५)पत्र,तसेच शहरातील वास्तव्याचा पुरावा अशा महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करून लस देण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नसून लवकरच त्यांना लशीची दुसरी मात्रा देण्याचे देखील आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
अपंग नागरिकांचे ‘वॉक इन‘पद्धतीने लसीकरण
मीरा भाईंदर शहरात अनेक अपंग नागरिक वास्तव्य करत आहे. अशा नागरिकांना लसीकरण केंद्रावर उभे राहून लस घेणे कठीण होत असल्याची तक्रार प्रशासनाला करण्यात येत होती. त्यामुळे २ जून रोज दुपारी १० ते ४ वाजेदरम्यान भाईंदर पूर्व येथील मोरेश्वर पाटील भवन येथे ‘वॉक इन‘ पद्धतीने अपंग नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.याकरिता अपंग नागरिकांकडे शासन निर्धारित अपंग पत्रक असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अखेर महापालिकेची मंजुरी
परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्याा विद्यार्थ्यांंचे लसीकरण करण्यास महापालिकेने मंगळवारी मंजुरी दिली आहे. वसई विरार शहरातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जात असतात. यंदा करोनामुळे त्यांना लसीकरण बंधनकारक करण्यात आले होते. परंतु १८ ते ४४ वर्ष वयोगटांचे लसीकरण बंद असल्याने या विद्यार्थ्यांची कोंडी झाली होती. याबाबतचे वृत्त सोमवारीच ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते. पालिकेने या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे घेऊन सोमवार ते शनिवार या दिवसात नजीकच्या पालिकेच्या केंद्रावर थेट जाऊन लसी घेता येणार आहे.