वसई– मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ मध्ये स्मार्ट पोलिसिंग ही संकल्पना यशस्वी पणे राबविण्यात आली आहे. पोलीस ठाण्यांचे नूतनीकरण करण्याबरोबर आधुनिक तंत्रत्रानाचा वापर करून विविध उपक्रम राबिवण्यात आले. त्यामुळे परिमंडळ १ आणि त्या अंतर्गत येणार्‍या ७ पोलीस ठाण्यांना आयएसओ नामांकन मिळाले नाहे.

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात एकूण ३ परिमंडळे आहेत. त्यापेकी मिरा रोड येथे परिमंडळ १ आहे. त्यात ३ सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालये आणि ७ पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. या परिमंडळात ७ कलमी कार्यक्रमांचे आयोजन करुन कार्यालये व पोलीस ठाणे यांना स्मार्ट बनविण्याची संकल्पना राबविण्यात आली होती. त्यानुसार पोलीस प्रशासन सामान्य नागरीकांसाठी अधिक अनुकूल बनविण्यात आले. अधिक प्रशिक्षित पोलीस दल आणि पोलीसींगमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाअधिक वापर करण्यात आला आहे. 

याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) प्रकाश गायकवाड यांनी सांगितले की आम्ही सर्व पोलीस ठाण्यांचे रुप पालटले आहे. पोलीस ठाण्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. कालबाहय अभिलेख अद्ययावत करण्यात आला. त्यामुळे कुठलाही दस्तावेज अवघ्या १ मिनिटात मिळतो. बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आला. नो प्लॅस्टिक झोन व ग्रिन ऑक्सीजन झोन कार्यान्वीत करण्यात आलेला आहे. सायबर क्राईम जनजागृती, अर्थिक गुन्हेगारी, महिला सुरक्षा आणि सर्वसाधरण संबंधित विषयांवर विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्यासाठी १०० हुन अधिक कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीमंडळ १ मिरारोड कार्यालयास (A++) मानांकन मिळाले आहे. तसेच नवघर आणि मिरा रोडच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयत तसेच काशिमिऱा, मिरा रोड आणि नवघर  पोलीस ठाण्याला (A++) नामांकन मिळाले आहे.

नागरिकांशी सौजन्याने बोलण्याचे प्रशिक्षण

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरीकांशी चांगले वागावे याकरिता त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणानंतर काही बदल झाला आहे का त्याची तपासणी वरिष्ठांनी केली. मी व्यक्तीश: ६८ अभ्यागतांना दूरध्वनी करून कशी वागणूक मिळाली याची माहिती घेतली त्यापैकी सर्वांनी चांगला अनुभव आल्याचे सांगितले असे काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले.