वसई- माणिकपूर पोलिसांच्या दडपशाहीविरोधात विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर शनिवारी ५ तास धरणे आंदोलन केले. खोटे गुन्हे मागे घेऊन मारहाण करणार्या पोलिसावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून माणिकपूर पोलीस वादात सापडले आहे. २० रुपयांच्या वादातून तक्रार करण्यासाठी माणिकपूर पोलीस ठाण्यात गेलेला चावी बनविणारा मोहम्मद अन्सारी याला पोलीस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांनी बेदम मारहाण केली होती. दुसर्या घटनेत वसईतील सामाजिक कार्यकर्ते ॲड आदेश बनसोडे यांच्यावर युट्युबवरील विश्लेषक ध्रुव राठी याची एक चित्रफीत व्हॉटसॲप समूहात शेअर केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही घटना पोलिसांचा मनमानीपणा आणि हुकूमशाहीपणा दाखविणार्या असल्याने वसईत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
पोलिसांच्या या मनमानीपणाचा आणि दडपशाहीचा निषेध करण्यासाठी विविध सामाजिक संघटना शनिवारी एकत्र आल्या होत्या. सकाळी १० पासून वसईच्या परिमंडळ २ च्या पोलीस उपायु्क्त पूर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोल करण्यात आले होते. त्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), कॉंग्रेस, आम आदमी पक्ष आदींबरोबर मी वसईकर, वकील संघटना, पर्यावरण समिती, जनआंदोलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन, समाजवादी पक्ष आदी पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
माणिकपूर पोलीस मुजोरपणे वागत असून नागरिकांचा आवाज दाबला जात आहे. पोलिसांची कृती नागरिकांच्या मुलभूत स्वातंत्र्यावर गदा आणणारी आहे, असा आरोप विविध सामाजिक संघटनांनी केला आहे. पोलीस भूमाफियांना, बिल्डरांना साथ देतात आणि सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करतात असा आरोपही यावेळी करण्यात आला.
हेही वाचा – वसई : एचडी बीच रिसॉर्ट मालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल
खोटे गुन्हे दाखल करणारे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांना बडतर्फ करा, मारहण करणारे पोलीस उपनिरीक्षक राजशेखर सलगरे यांना निलंबित करा, ॲड आदेश बनसोडे यांच्यावरील गुन्हा मागे घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगुले यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन असले तरी त्या अन्य कामात व्यस्त असल्याने येऊ शकल्या नाही. मात्र दुपारी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले. सुमारे ५ तास हे आंदोलन सुरू होते.