वसई- वसईतील एचडी रिसॉर्टमधील तरण तलावात झालेल्या चिमुकलीच्या मृत्यूप्रकरणी रिसॉर्ट मालकांचा हलगर्जीपणा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे रिसॉर्ट मालक रोमन डिमेलो याच्याविरोधात हलगर्जीपणा दाखवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी २९ मे रोजी वसईच्या रानगाव येथील एचडी बीच या रिसॉर्टमधील तरणतलावात बुडून समीक्षा जाधव (७) या चिमुकलीचा मृत्यू झाला होता. सकाळी भांडुप येथील महिलांचा एक गट या सहलीसाठी आला होता. त्यात समीक्षा आपल्या आजीसह आली होती. सकाळी ते रिसॉर्टमधील तरण तलावात उतरले होते. दुपारच्या जेवणाच्या वेळी सर्व जण तरण तलावातून बाहेर आले आणि जेवणाच्या खोलीत गेले होते. त्यावेळी समीक्षा खेळत खेळत तरण तलावात उतरली. मात्र त्यावेळी कुणी जीवरक्षक नसल्याने समीक्षा पाण्यात बुडून मरण पावली होती. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात रिसॉर्टचालकांचा हलर्गजीपणा दिसून आला.
हेही वाचा – वर्सोवा खाडी भूस्खलन दुर्घटना : दोन दिवसानंतरही चालक ढिगाऱ्याखाली, शोध कार्य सुरूच
..जीवरक्षक तिला पाण्यात बघत होता
या रिसॉर्टमधे ३ जीवरक्षक होते. जेवणाच्या वेळी पर्यटक तरणतलावातून बाहेर निघाल्यानंतर जीवरक्षक निघून गेले होते. तरणतलाव त्यांनी झाकून बंद केला नव्हता. तसेच तेथे जीवरक्षक तैनात नव्हता. त्यामुळे समीक्षा पाण्यात गेली तेव्हा कुणाचे लक्ष नव्हते. मात्र ती बुडू लागताच लांबून एका जीवरक्षकाने पाहिले. परंतु मुलगी पाण्यात खेळत आहे, असा त्याचा समज झाला. परंतु ती बुडायला लागली तेव्हा तो पाण्यात तिला वाचवायला गेला. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता, असे पोलिसांनी सांगितले. जर तरणतलाव बंदिस्त केला असता किंवा जीवरक्षक तैनात करून कुणाला जाऊ दिले नसते तर ही दुर्घटना घडली नसती असे पोलिासंनी सांगितले. मुलगी बुडाल्यावर तिला वाचविण्यासाठी देखील कुठलीच यंत्रणा नसल्याचे निदर्शनास आले आहे. जीवरक्षक पोहोचेपर्यंत तिचा जीव गेला होता. तरणतलावाजवळील सीसीटीव्ही केवळ नावाला होता. कॅमेरा चालू होता मात्र त्यात दृश्य जतन (सेव्ह) केले जात नव्हते.
हेही वाचा – वसई : अनैतिक संबंधातून महिलेची हत्या; मतदार यादीवरून पटवली ओळख, स्प्रेवरून लावला छडा
या सर्व बाबींमुळे आम्ही रिसॉर्टचालक रोमन डिमेलो (५२) याच्याविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी दिली.