वसई: आरती यादवची हत्या होत असताना त्या घटनेचे मोबाईल मधून चित्रण करणार्‍या जमावाचे पोलिसांनी जबाब नोंदिवण्यास सुरवात केली आहे. आता पर्यंत वालीव पोलिसांनी १४ जणांचे जबाब नोंदविले आहेत. त्यामध्ये घटनास्थळी हजर राहून चित्रिकरण करणारे नागरिक आणि हत्येसाठी ज्या कंपनीतून पाना आणला त्यांचा समावेश आहे.

मंगळवार ११ जून रोजी आरती यादव (२२) या तरूणीची वसईच्या गावराईपाडा येथे भर रस्त्यात तिचा प्रियकर रोहीत यादव (२९) याने लोखंडी पान्याने वार करून हत्या केली होती. घटनास्थळावरूनच पोलिसांनी रोहीतला अटक केली होती. सध्या तो ६ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. या संवेदनशील प्रकरणात अधिकाअधिक भक्कम पुरावे गोळा करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. हत्येचा वेळी उपस्थित जमाव आपल्या मोबाईल मधून हत्येच्या प्रसंगाचं चित्रण करत होता. त्यामुळे पोलिसांनी याच लोकांना शोधून त्यांना साक्षीदार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी या लोकांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत पोलिसांनी १४ जणांचे जबाब नोंदविले आहेत. हत्या होत असताना एक तरूण मदतीसाठी पुढे आला होता. परंतु रोहीतने त्याच्या अंगावर पाना उगारल्याने तो मागे फिरला होता. तो महत्वाचा साक्षीदार होता. मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही.

हेही वाचा : विरारमध्ये झाड पडून महिलेचा मृत्यू, दोन दिवसांनी आढळला बेपत्ता वृद्धेचा मृतदेह

आरोपी रोहीतने हत्येच्या एक आठवड्यापूर्वीच एका कंपनीतून लोखंडी पाना उचलून आणला होता. पोलिसांनी त्या कंपनीला भेट देऊन तेथील व्यवस्थापकाचाही जबाब नोदविला आहे. या प्रकरणात रोहीत एकटाच असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरतीने रोहितची पोलिसांकडे तक्रार केली होती आणि त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते. आरती पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही, हे समजल्याने संतापाच्या भरात त्याने ही हत्या केली. रोहीत यादव सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत आहे.