वसई- पोलिसांना एरवी मोठमोठ्या गुन्हेगारांची बोलती बंद करता येते. मात्र समोर कुणी इंग्रजी बोलणारा आला की पोलिसांचीच बोलती बंद होत असते. पण तेव्हा वेळ मारून नेता येते. परंतु परदेशी आरोपी असले की पोलिसांना इंग्रजी येत नसल्याने तपासही नीट करता येत नाही. त्यामुळे पोलिसांना किमान प्राथमिक इंग्रजी बोलता यावं यासाठी आचोळे पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आहे. मंगळवारपासून दररोज एक तास असे दोन महिने ही इंग्रजी शिकवणी चालणार आहे.
शासकीय कारभार मराठीतून करणे अनिवार्य आहे. परंतु अनकेदा अमराठी नागरिक तक्रार घेऊन येतात. त्यामुळे त्यांच्याशी पोलिसांना नीट संवाद साधता येत नाही. त्यात अमराठी आरोपी असले की ते मुद्दाम इंग्रजीत बोलून पोलिसांना अडचणीत आणत असतात. अमली पदार्थ, फसवणूक आदी प्रकरणात परदेशी विशेषत: नायजेरियन देशातील नागरिकांचा सहभाग असतो. त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांची मोठी पंचाईत होते. या परदेशी आरोपींना हिंदी येत नाही आणि पोलिसांना इंग्रजी येत नाही. ते इंग्रजी भाषेतील साध्या साध्या प्राथमिक गोष्टी देखील पोलिसांना कळत नाही. परिणामी योग्य तपास करता येत नाही आणि आरोपीला फायदा होतो. बहुतांश पोलिसांचे शिक्षण हे मराठीत झालेले असते. नंतर पुढे इंग्रजीचा संबंध येत नाही. त्यामुळे पोलीस कर्मचार्यांना इंग्रजी भाषेची अडचण भेडसावत असते.
हेही वाचा – वसई, भाईंदर पोलीस दलात मोठे फेरबदल; ३ अधिकारी परतले, ६ नवीन अधिकारी झाले कायम
त्यावर उपाय म्हणून आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजीत कुमार पवार यांनी पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांसाठी इंग्रजीची शिकवणी घेण्यास सुरू केली आहे. मंगळवारी या शिकवणी वर्गाची सुरवात झाली. दररोज सकाळी १० ते ११ या कालावधीत हे वर्ग शाळा भरणार आहे. एक इंग्रजी शिक्षक पोलिसांना प्राथमिक इंग्रजी शिकवणार आहे. दोन महिने ही शाळा भरणार आहे. अमराठी नागरिकांशी संवाद साधताना तसेच नानायजेरिय आरोपींना आणल्यावर आमच्या पोलिसांची अडचण व्हायची. त्यामुळे किमान प्राथमिक इंग्रजी यायला हवं या उद्देशाने हे इंग्रजी शिकवणी वर्ग सुरू केली आहे, असे सुजितकुमार पवार यांनी सांगितले. यामुळे पोलिसांना २५ टक्के इंग्रजी बोलता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – शहरबात : उरलेल्या वसईला एकदा बघून घ्या…
आफताबने पोलिसांना दिला होता गुंगारा
वसईच्या श्रद्धा वालकरच हत्या देशभर गाजली. आफताब पूनावाला याने तिची हत्या केली होती. परंतु हत्या उघड होण्याआधी चौकशीसाठी आफताबला माणिकपूर पोलीस ठाण्यात आणलं होतं. मात्र त्याने मुद्दाम अस्खलित इंग्रजीत संभाषण करून पोलिसांना चकमा दिला होता. त्याच्या इंग्रजीमुळे पोलीस गोंधळले होते. अन्यथा ते प्रकरण दिल्ली ऐवजी वसई पोलिसांनाच उघड करता आलं असतं.