वसई- मोबाईल टॉवरमधून रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी लावण्यात येणारे मशीन (आझना कार्ड) चोरी करून आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या ७ आरोपींच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून ४० लाख रुपये किंमतीची ३६ यंत्रे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
वसई विरार शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोबाईल टॉवरवरील नेटवर्कसाठी बसविण्यात आलेले रेडीओ फ्रिक्वेन्सी मशीन (आझना कार्ड) चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. या प्रकणाचा गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने तपास सुरू केला होता. घटनास्थळाचे तांत्रिक विश्लेषण करून तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी शुभम यादव (२४), शैलेश यादव (२५), कपुरचंद्र गुप्ता (२५), बंन्सीलाल जैन (५०), जाकीर मल्लिक (२५), जैद मलिक (१९) आणि मोहम्मद जुनैद मलिक (२४) यांना ताब्यात घेतले आहे. काही आरोपींना दिल्ली, उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. या आरोपीकडून आतापर्यंत ४० लाख रुपये किंमतीचे ३६ मशिन कार्ड, मोबाईल फोन, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपीकडून बिहार, झारखंड, पश्चिम बगाल, पंजाब, गोवा या राज्यातून चोरी केलेले आझना कार्ड हस्तगत केले आहेत.
परदेशात व्हायचा वापर
याबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले की, अटक आरोपी सदर चोरीचे मशीन हे हाँगकाँग व चीन येथे बेकायदेशीररित्या विक्री करत होते. गुन्ह्यासाठी त्याचा वापर केला जात होता. अटक आरोपी यांनी मागील एक वर्षापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, नालासोपारा परिसरात मोठ्या प्रमाणात आझना कार्डची चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील यांच्या पथकाने केली.