वसई- नालासोपारा पूर्वेच्या यादवेश विकास शाळेत १४ वर्षीय विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षकाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटले आहे. मंगळवारी संतप्त पालकांनी शाळेबाहेर उग्र आंदोलन करून शाळा बंद करण्याची मागणी केली. शाळेत अनेक मुलींसह शिक्षिकांचे देखील लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथे यादवेश विकास इंग्रजी शाळा आहे. आरोपी अमित दुबे (३०) हा या शाळेत शिक्षक आहे. तसेच तो वलईपाडा येथे उज्वल नावाचे खासगी शिकवणी वर्ग (क्लासेस) घेतो. दुबे यांने शाळेतील १४ वर्षीय विद्यार्थिनीवर सतत ५ महिने लैंगिक अत्याचार करत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित विद्यार्थिनीला धमकावून तो शाळा आणि शिकवणी वर्गात (क्लासेस) बलात्कार करत होता. पीडितेच्या कुटुंबियांना हा प्रकार समजताच त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पेल्हार पोलिसांनी आरोपी शिक्षक अमित दुबे याला अटक केली आहे. हा प्रकार समजताच मंगळवारी सकाळी संतप्त पालकांनी शाळेबाहेर उग्र निदर्शने करून शाळा बंद करण्याची मागणी केली. शाळेच्या व्यवस्थापकाला पीडित मुलीने आरोपी शिक्षकाकडून त्रास होत असल्याचे सांगूनही त्याने दुर्लक्ष केले आणि पीडितेला गप्प बसण्यासाठी सांगितले, असा आरोप मुलीच्या पालकांनी केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा – वसईत राष्ट्रीय महामार्गावर मानवी साखळी आंदोलन, रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने संताप

हेही वाचा – शिवसेना शिंदे गटाचे नालासोपार्‍यात शक्तिप्रदर्शन, उत्तर भारतीयांचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघावर दावा

अनेक मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप

पीडित मुलीच्या भावाने शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहे. यापूर्वी शाळेतील २० ते २५ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप त्याने केला. शाळेतील शिक्षिका देखील या अत्याचाराला बळी पडली असून तिने शाळा सोडल्याचे त्याने सांगितले. माझी बहीण शाळेत बेशुद्ध पडली मात्र शाळेने प्रकार दडवला आणि आरोपींना पाठीशी घातले. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापकावरही गुन्हे दाखल करून ही शाळा बंद करण्याची मागणी केली. पेल्हाप पोलिसांनी आरोपी अमित दुबे याला भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (२) (एफ) ६५ (१) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो)च्या कलम ४, ५. ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या शाळा परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai angry parents march on school after rape of girl student nalasopara incident ssb