वसई- पालघर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख दावेदार असलेल्या बहुजन विकास आघाडीने आपली पारंपरिक शिट्टी निशाणी कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. पक्षाचे उमेदवार राजेश पाटील आता शिट्टी चिन्हावर प्रचार करणार आहे. शिट्टी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून यामुळे विजय सोप्पा होणार असल्याचा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.
बहुजन विकास आघाडीची वसई विरार महापालिकेत निर्विवाद सत्ता असते. शिट्टी ही निशाणी या पक्षाचे पारंपरिक चिन्ह. सर्व निवडणुका या शिट्टी चिन्हावर लढविण्यात येत होत्या. त्यामुळे शिट्टीवाले अशी ओळख होती. परंतु मागील निवडणुकीत एका स्थानिक पक्षाच्या माध्यमातून शिट्टी चिन्ह पळविण्यात आले होते. त्यामुळे यंदा शिट्टी चिन्ह वाचविण्यासाठी पक्षाने प्रयत्न केले. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी राजेश पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. सोमवारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले आणि बहुजन विकास आघाडीला शिट्टी चिन्ह मिळाले. यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला आहे.
हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात तीन घरफोड्या, लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास
शिट्टी चिन्हामुळे आमचा विजय आता अधिक सोपा झाला आहे. कार्यकर्ते उत्साहात आणि जोमाने कामाला लागले आहेत, अशी प्रतिक्रिया पक्षाचे संघटक सचिव अजीव पाटील यांनी दिली. पालघर जिल्ह्यात आमची ओळख शि्टटीवाले अशी होती. काही लोकांना यंदाही डमी अर्ज भरून शिट्टी चिन्ह पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र आम्ही कायदेशीर मार्गाने आमचे चिन्ह परत मिळवले आहे, असेही पाटील म्हणाले.
हेही वाचा – नाशिक : द्राक्ष बागायतदाराची १४ लाख रुपयांना फसवणूक
मतांमध्ये वाढ होण्याचा विश्वास
मागील निवडणुकीत बविआला ४ लाख ९१ हजार मते मिळाली होती. यंदा या मतांमध्ये वाढ होईल असा विश्वास अजीव पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे घटक पक्ष यंदा सोबत नसले तरी जिल्ह्यात कामे केलेली आहे. राजेश पाटील यांनी आमदारकीच्या काळात जिल्हा पिंजून काढला आणि विकासकामे केली. त्याचा फायदा होणार असून मागील वेळेपेक्षा जास्त मते मिळवून आमचा विजय होईल, असे ते म्हणाले.