नायगाव उड्डाण पुलाच्या पूर्वेकडील बाजूस तयार केलेला बॅरिगेट तुटल्याची घटना घडली आहे. आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. बॅरिगेट तुटून पुलाच्या मध्येच असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नायगाव वसईचा परिसर महामार्गाला जोडण्यासाठी नायगाव पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत पूर्ण करण्यात आले आहे.यामुळे नागरिकांचा प्रवास सुलभ झाला आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुलाच्या दोन्ही ठिकाणच्या भागात निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता या पुलाच्या दोन्ही बाजूने लोखंडी बॅरिगेट लावून हा पूल हलक्या वाहनांसाठी खुला केला होता.

पूल वाहतुकीसाठी खुला होऊन केवळ चार महिने झाले आहेत. त्यातच आता या पुलावर एकापाठोपाठ एक अशा अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. आज पहाटेच्या सुमारास नायगाव उड्डाण पुलाच्या पूर्वेकडील बाजूचे बॅरिगेट तुटल्याची घटना समोर आली आहे. अवजड वाहनाच्या धडकेत हे बॅरिगेट तुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे बॅरिगेट तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले लोखंड गंजलेले व निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

पुलाच्या कामाची योग्य ती तपासणी करावी –

या पुलावरून दररोज हजारो वाहने ये जा करतात. जर हे बॅरिगेट एखाद्या वाहनचालकाच्या अंगावर पडले असते तर मोठी दुर्घटना घडली असती, असेही नागरिकांनी सांगितले आहे. एमएमआरडीएने या पुलाच्या कामाची योग्य ती तपासणी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

वाहतुकीला अडथळे –

नायगाव उड्डाण पुलाच्या पूर्वेच्या भागात बॅरिगेट तुटून मुख्य मार्गात कोसळला होता. पाच ते सहा तास उलटून गेले तरी हा बॅरिगेट बाजूला केला नव्हता. बॅरिगेटच्या बाजूने केवळ एक वाहन जाईल इतकीच जागा असल्याने पूर्व व पश्चिमेकडे ये जा करणाऱ्या वाहनांना अडथळे निर्माण झाले होते.