लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : मागील चार ते पाच दिवसापासून सुरू झालेली रोरो सेवा शनिवारी दुपारी वसईच्या जेट्टी जवळ धडकली व त्यानंतर जागीच अडकून पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला. वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे वसई- भाईंदर दरम्यान मंगळवार पासून प्रायोगिक तत्त्वावर रोरो सेवा सुरू करण्यात आली आहे. सेवा सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. सकाळी पावणे सात ते सायंकाळी साडे सात या दरम्यान ही सेवा दिली जाते.
शनिवारी नेहमी प्रमाणे या फेरीबोटीची सेवा सुरू होती. मात्र दुपारच्या सुमारास वसईच्या जेट्टीवर ही बोट लावत असताना अचानकपणे ही बोट जेट्टीला धडकली व त्याचा मोठा हादरा त्यात असलेल्या प्रवाशांना बसला.
आणखी वाचा-मराठा आरक्षणासाठी लग्नाचा मुहूर्त बाजूला ठेवून वऱ्हाडींसह रास्ता रोको आंदोलनात उतरले नवरा-नवरी
त्यातच समुद्राला आहोटी आली असल्याने ती बोट जागीच अडकून राहिली. जवळपास दोन ते तीन तासापासून बोटीला काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले होते. समोरून दुसऱ्या बोटींना दोर बांधून बोट खेचून पुढे नेण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी दोन वेळा दोर तुटला असल्याचे प्रवाशांनी सांगितले आहे. या घडलेल्या घटनेमुळे काही काळ प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.