वसई : मागील आठ ते दहा वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित जिल्हा प्रादेशिक कार्यालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. स्वातंत्र्यदिनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी १३.९७ कोटी रुपये निधी खर्च केला जाणार असून येत्या १८ महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे आदेश मंत्र्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पालघर जिल्ह्याचे उपप्रादेशिक कार्यालय हे मागील तेरा वर्षांपासून चंदनसार येथे भाड्याच्या जागेत चालविले जात आहे. तेथेही अपुरी जागा व धोकादायक इमारत यामुळे अडचणी येत आहेत. यासाठी नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालय तयार करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार २०१६ मध्ये गोखीवरे येथील सर्व्हे क्रमांक २३३/अ/१ व ४ ही जागा शासनाने मंजूर केली होती. २०१७ मध्ये ही जागा परिवहन विभागाच्या नावे करून ३.३ हेक्टर या जागेत कार्यालयीन इमारत व अद्यावत वाहने पासिंग व तपासणी प्रमाणपत्र केंद्र तयार करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र जागेची, रस्त्याची विविध आवश्यक परवानग्या यांच्या अडचणीमुळे कार्यालयाचे काम रखडले होते. आता आवश्यक परवानग्या व जागेच्या मार्गातील अडथळे दूर झाल्याने नवीन प्रादेशिक कार्यालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा – वसई : पालिकेच्या परिवहन सेवेची ई बस सेवा सुरू, स्वातंत्र्यदिनी १० ई बसचे लोकार्पण
गुरुवारी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गोखीवरे येथे प्रादेशिक कार्यालयाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील, पालघर जिल्हापरिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सवरा, राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, माजी खासदार राजेंद्र गावित, अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यालयाची इमारत ही दोन मजली असून यात २४ हजार ९१२ चौरस फुटांचे बांधकाम त्यात केले जाणार आहे. यासाठी सुमारे १३.९७ कोटी इतका निधी खर्च केला जाणार असून १८ महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. हे काम दिलेल्या विहित वेळेत पूर्ण करा अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना भूमिपूजन सोहळ्या दरम्यान केल्या आहेत.
दोषविरहित वाहन तपासणी होणार
रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाणही वाढत आहे. अनेकदा वाहनातील तांत्रिक बिघाडही त्याला कारणीभूत असतो. यासाठी कार्यालयाच्या आवारातच वाहनधारकांसाठी चालकांची परवाना चाचणी केंद्र, ऑटोमॅटिक वाहन गुणवत्ता तपासणी केंद्र सुरू केले जाणार असल्याचे राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे. यामुळे दोष विरहित वाहन तपासणी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग टेस्ट, कॅमेरे, सेन्सर, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचेही भीमनवार यांनी सांगितले आहे.
पालघर जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढत आहे. यातील ७० टक्के वाहने वसईतील आहेत. या प्रादेशिक कार्यालयाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा. – हितेंद्र ठाकूर, आमदार वसई
पालघर जिल्ह्यासाठी प्रादेशिक कार्यालय महत्वाचे होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना विहित वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत. – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री पालघर