वसई – मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील वरसावे येथे घोडागाडी शर्यत आयोजित करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्राण्यांसाठी काम करणार्‍या पेटा संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार काशिगाव पोलिसांनी कारवाई करून ६ घोड्यांची सुटका केली आणि ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

वरसावे पुलावर मध्यरात्री घोडागाडी शर्यत होणार असल्याची माहिती पेटा (पिपल फॉर द एथिकल ट्रिटमेंट ऑफ ॲनिमल) या प्राण्यांसाठी काम करणार्‍या संस्थेने मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तांना दिली होती. त्यानुसार मध्यरात्री काशिगाव पोलिसांनी या वरसावे नाका परिसरात गस्त घातली होती. रात्री साडेबाराच्या सुमारास काही तरुणांचा गट घोडागाडी शर्यत करत असल्याचे आढळून आले. पोलिसांच्या पथकाने त्यांना अडवून ताब्यात घेतले आणि घोड्यांची सुटका केली.

हेही वाचा – वसई : वाहन विक्रेते व गॅरेज वाल्यांकडून रस्ते गिळंकृत, रस्त्यावरच वाहन विक्रीचा बाजार व दुरुस्ती; वाहतुकीला अडथळे

हेही वाचा – मिरा रोड येथे धार्मिक कार्यक्रमावरून गोंधळ; धर्मांतर होत असल्याचा संशय

या कारवाईत ओवीन डिमेलो, रन्सी कालतील आणि बेनी परेरा या तिघांना अटक केली आहे. घोडागाडी शर्यत लावून प्राण्यांना क्रूर वागणूक देणे, सार्वजनिक रहदारीस अडथळा आणल्याबद्दल भारतीय न्याय दंडसंहितेच्या कलम २९१, २८१, १२५, ३(५) तसेच प्राण्यांचा छळ प्रतिंबधक अधिनियम १९६० च्या कलम ११(१) (अ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी भाईंदरच्या उत्तन गाव परिसरात राहणारे असून ऊरूस यात्रेच्या निमित्ताने त्यांनी ही बेकायदेशीर घोडागाडी शर्यत लावली होती. पोलिसांनी या कारवाईत ६ घोड्यांची सुटका केली असून त्यांना वसईच्या सकवार येखखील पशू आश्रमात ठेवण्यात आले आहे.