वसई – वसई विरार शहराची लोकसंख्या पुढील २० वर्षात ४५ लाख होणार असून अनेक समस्या निर्माण होऊन शहराचे नियोजन कोलमडणार आहे. या विस्फोटक लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून स्थानिक भूमीपुत्र उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. वसईसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे पर्यावरणतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. शहराच्या प्रस्तावित विकास आराखड्याबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार साठीचा विकास आराखडा २०२१ ते २०४१ साठी तयार होत आहे. यापूर्वी लागू झालेल्या विकास आराखड्यात आरक्षण व विकासाच्या नावाखाली वसई विरार शहराचे विद्रुपीकरण झाले आहे. यासाठी नवीन आराखडा लागू होण्या पूर्वीच पुन्हा एकदा वसईकरांनी सावध भूमिका घेतली आहे. नव्याने तयार होणारा आराखडा हा पर्यावरण व येथील सर्वसामान्य नागरिकांना पूरक असला पाहिजे यासाठी रविवारी वसईच्या निर्मळ येथील समाज सेवा मंडळ सभागृहात पर्यावरण तज्ञ, नगररचना अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. यावेळी वसई विकास आराखडा व आव्हाने यावर चर्चा करण्यात आली. प्रसिद्ध नगररचनाकार अनिरुद्ध पॉल व नगररचना संशोधक दानिया डाबरे यांनी तयार होणारा प्रारूप आराखडा व यापूर्वीचे आराखडे व त्यामुळे होणारे नैसर्गिक रित्या कोणते परिणाम होऊ शकतात. याबाबत सादरीकरण करण्यात आले.यावेळी त्यांनी शहराचा विकासाच्या नावाखाली शहराचा मोठा नैसर्गिक पट्टा नष्ट होऊ लागला आहे.वाढते काँक्रिटीकरण हे शहरासाठी घातकच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिवसेंदिवस येथील नागरिकरण वाढणार आहे. मात्र त्या दृष्टीने कोणतेच नियोजन आता ही दिसून येत नाही कचरा विल्हेवाट प्रकल्प नाही, अरुंद झालेले पाणी वाहून नेणारे मार्ग, पाणथळ जागेत कचरा टाकून बुजविण्याचे प्रकार, धारण तलावांचा अभाव, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील वाढती अतिक्रमण, प्रदूषण नियंत्रण अभाव, वाहतूक कोंडी, बावखळ बुजविण्याचे प्रकार अशा सर्व गोष्टींचा मोठा परिणाम शहरात दिसून येणार असल्याचे ही या तज्ञांनी यावेळी सांगितले.

या झालेल्या चर्चेदरम्यान समीर वर्तक, सचिन मर्ती, शशी सोनवणे, संजय कोळी, मिलिंद खानोलकर, मॅक्सवेल या सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध परिणामकारक मुद्दे उपस्थित करीत चिंता व्यक्त केली. त्यामुळे आराखडा कोणत्याही क्षणी लागू होऊदे त्यासाठी आतापासून त्यावर हरकती, नियोजनबद्ध विकासाच्या सूचना तयार करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अभ्यास पथके

वसई विरार शहर हे सागरी, नागरी, आणि डोंगरी अशा तिन्ही भागात विस्तारला आहे. यासाठी आता पासून विविध भागाचा अभ्यास सुरू केला जाणार आहे. पर्यावरण तज्ञ, नगररचना अभ्यासक, व सामाजिक कार्यकर्ते यांची पथके स्थापन केली जाणार आहेत. याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे ही काम केले जाईल असे मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले आहे.

काय आहे विकास आराखडा?

वसई विरार महापालिकेच्या यापूर्वीच्या वीस वर्षांच्या विकास आराखड्याची मुदत २०२१ मध्ये संपली होती. राज्य शासनाने २५ जानेवारी २०१९ च्या अधिसूचनेनुसार सर्व महापालिकांना भौगोलिक मानांकनाद्वारे (जीआयएस) प्रणाली द्वारे विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होेते.. त्यानुसार तो २०२१ ते २०४१ या २० वर्षांसाठी विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचा सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. नोव्हेबर २०२५ मध्ये हा विकास आराखडा प्रसिध्द केला जाणार आहे.