वसई: वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी अचानक वाढवण बंदर भूमिपूजन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला.  मात्र त्यांच्या दुटप्पी भूमिकेमुळे मच्छीमार बांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वाढवण बंदर प्रकल्प उभारणीला सुरवातीपासूनच मच्छीमार बांधवांनी कडाडून विरोध करीत हा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी सरकारकडे केली होती. याबाबत समुद्र किनाऱ्यावर यासह विविध ठिकाणी मच्छीमार बांधवांची आंदोलने झाली होती. त्यात भाजपचे वसई विरारचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सहभागी होत  या प्रकल्पाला विरोध दर्शविला होता.

‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’ असे फलकही हातात घेत हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशी मागणी केली होती. मात्र शुक्रवारी पालघर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदर प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी वसई विरारमधून नागरिक नेण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला असल्याचे चित्र दिसून आले. तसा त्यांचा फोटोही समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. एकेकाळी भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी वाढवण बंदर प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. आता मात्र त्याच प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला जाण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांची या प्रकल्पाबाबत दुटप्पी भूमिका असल्याचा आरोप वसई काँग्रेसचे कुलदीप वर्तक यांनी केला आहे. तसे ट्विटही त्यांनी केले आहे.

हेही वाचा – वर्सोवा पुलावरून दाम्पत्याची उडी; पतीला वाचवले, पत्नीचा शोध सुरू

कोळी बांधवांचा या प्रकल्पाला विरोध असताना त्यांच्या विरोधात जाऊन हा प्रकल्प उभारला जात असल्याने एक प्रकारे ही कोळी मच्छीमार बांधवांची फसवणूक आहे असेही वर्तक यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे मच्छीमार बांधवांचा प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी आघाडीवर असलेले नेते अचानक विरोध सोडून भूमिपूजन सोहळ्यात सहभागी झाल्याने मच्छीमार बांधवांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा – मिरा भाईंदर मध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर प्राणघातक चाकू हल्ला; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

मच्छीमार बांधवांची दिशाभूल ?

पालघर येथे होणाऱ्या वाढवणं बंदर प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याला विरोध दर्शवण्यासाठी मच्छीमार संघटना व मच्छीमार बांधव एकवटले होते. मात्र भूमिपूजनाच्या दिवशी काही मच्छीमार बांधव हे भूमिपूजन सोहळ्यासाठी रवाना झाले होते. त्यांची काही नेत्यांनी दिशाभूल करून त्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी नेले आहे तर दुसरीकडे काहींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना त्या ठिकाणी नेले असल्याची चर्चाही रंगू लागली आहे.