वसई– गुन्हे शाखा १ च्या पथकाने अमली पदार्थांच्या व्यवहारातील एका टोळीचा पदार्फाश करून २२ कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश असून दोन आरोपी हे नायजेरियन आहेत. दक्षिण आफ्रितून तस्करी करून हे कोकेन भारतात आणण्यात आले होते.
गुन्हे शाखा १ च्या पथकाने अमली पदार्थांचा व्यवहार करणार्या एका टोळीचा छडा लावला आहे. याप्रकरणी भाईंदर मधून एका सबिना शेख (४२) या महिलेला अटक केली. तिच्याकडे ११ किलो वजनाचे सुमारे १७ कोटींची अमली पदार्थ जप्त करण्यात आले होत. तिच्या चौकशीत ती वसईतील नायजेरिय नागरिकांच्या मदतीने अमली पदार्थांची खरेदी विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी या टोळीतील दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली. त्यात एका नायजेरियन महिलेचा समावेश आहे. या तिघांकडून एकूण १४ किलो वजानचा कोकेन, अमेरिकन आणि नायजेरियन चलनाच्या नोटा असा एकूण २२ कोटी ३३ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आफ्रिकेतून भारतात आणले कोकेन
या कारवाईबाबत माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले की, हे कोकेन आफ्रिकेतून आणण्यात आले होते. कोकेन कॅप्सूल मध्ये भरून मानवी तस्करांच्या माध्यमातून पोटात दडवून आणण्यात आले होते. याप्रकरणातील ४ थ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. यातील तिसरी महिला आरोपी नायजेरियन असून ती एव्हरशाईनच्या महेश पार्क इमारतीत राहते. ही इमारत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांचा अड्डा बनली आहे. तिला घर भाड्याने देणाऱ्यावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती बडाख यांनी दिली.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, संजय शिंदे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार सचिन हुले, अश्विन पाटील, पोलीस शिपाई गौरव बारी, सौरभ इंगळे, धीरज मेंगाणे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सचिन चौधरी, संतोष चव्हाण आदींच्या पथकाने की कारवाई केली.
पंधरा दिवसातील दुसरी मोठी कारवाई
वसई विरार तसेच मिरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांच्या व्यवहाराचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात गुन्हे शाखा २ च्या पथकाने वसईतील एव्हरशाईन येथून एका नायजेरियन नागरिकाला ११ कोटींच्या अमली पदार्थासह अटक केली होती. अमली पदार्थ विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. जानेवारी ते मार्च २०२५ या ३ महिन्यात २३३ ठिकाणी छापे टाकण्यात आले. याप्रकरणी ५० जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईत साडेपाच कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. एप्रिल महिन्यात सुमारे १२ कोटींची अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.