complaint boxes Schools Vasai : विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयाबाहेर तक्रार पेटी लावण्याचा निर्णय केवळ कागदोपत्री राहिला आहे. बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांनी या सूचनेकडे पाठ फिरवली आहे. पोलिसांनी देखील त्याची अंमलबजावणी केलेली नाही.
शहरातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी घटना घडत आहेत. याशिवाय अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहे. भीती आणि बदनामीमुळे मुली पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी पुढे येत नसतात. अशा मुलींना तक्रार करता यावी यासाठी शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर तक्रार पेटी लावण्याचे निर्देश तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. परंतु ८० टक्कयांहून अधिक शाळा महाविद्यालयात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.
हेही वाचा – भाईंदर खाडीत राज्यातील पहिला डबलडेकर पूल, वर मेट्रो आणि खाली वाहनांसाठी पूल
नालासोपार्यातील शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलीने शाळेकडे तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे या तक्रार पेट्या किती आवश्यक आहेत ते दिसून येते असे जाणीव संस्थेचे समनव्यक मिलिंद पोंक्षे यांनी सांगितले. शाळा आणि महाविद्यालयाच्या बाहेर तक्रार पेटीत मुलींनी तक्रार केली तर पोलीस त्यावर कारवाई करणार अशी संकल्पना होती. २०२१ मध्ये वसईच्या तत्कालीन पोलीस उपयुक्तांनी देखील अशा तक्रार पेट्या लावण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्याची देखील अंमलबजावणी झाली नाही.
© The Indian Express (P) Ltd