वसई: बहुचर्चित ई बसेसचा पहिला टप्पा अखेर पालिकेच्या ताफ्यात दाखल झाला आहे. गुरुवारी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १० ई बसेसचे उद्घाटन करण्यात आले. वसई विरार शहरातील प्रदूषण कमी व्हावे व पर्यावरण संतुलन राखले जावे यासाठी पालिकेने विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतून या बसेस खरेदी करण्यासाठी निधी मिळाला आहे. सुरुवातीला पालिकेने ५७ ई बसचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५७ कोटी रुपये खर्चून ४० ई बस पालिकेने खरेदी केल्या आहेत. त्या टप्प्याटप्प्याने नागरिकांच्या सेवेत दाखल केल्या जात आहेत. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १० ई बसचे लोकार्पण करून त्या नागरिकांच्या सेवेसाठी सुरू केल्या आहेत. ९ मीटर व १२ मीटर लांबीच्या या ई बस आहेत. अन्य बसही लवकरच दाखल होत आहेत. नोव्हेंबरनंतर इतर ज्या १७ बसेस आहेत त्यासुद्धा येणार आहेत. यातील काही बसेस वातानुकूलित असल्याने प्रवाशांना गारेगार प्रवासाचाही आनंद घेता येणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे. बसचे उद्घाटन झाल्यानंतर आयुक्तांनी बसमधून फेरफटका मारून बसची पाहणी केली. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त (परिवहन) नानासाहेब कामठे उपस्थित होते.
पंतप्रधान अनुदान योजनेतून आणखी १०० ई बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे पालिकेकडे नागरिकांना सेवा देण्यासाठी १५७ ई बस उपलब्ध होणार आहेत. या बस चार्जिंग करण्यासाठी परिवहन भवन, सातिवली, अलकापुरी या ठिकाणी व्यवस्था करण्यात येणार आहे.
हेही वाचा – नालासोपाऱ्यात दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त; नायजेरियन महिलेला अटक
शहरातील नागरिकांना चांगली परिवहन सेवा मिळावी यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. हळूहळू ई बसेस उपलब्ध होतील. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा. – अनिलकुमार पवार, आयुक्त, महापालिका वसई विरार