वसई : वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इटलीच्या व्हॅटीकन सिटीचे बिशप पोप यांनी ही नियुक्ती जाहीर केली. वसई विरारसह संपूर्ण पालघर जिल्हा हा वसई बिशप हाऊसच्या अखत्यारित येतो. वसई धर्मप्रांताचे बिशप फेलिक्स मच्याडो यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त होते. नवीन बिशपच्या नियुक्तीची प्रक्रिया मागील ५ महिन्यांपासून सुरू होती. यासाठी ३ नावांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
शनिवारी दुपारी इटलीच्या व्हॅटीनक सिटी येथील बिशप पोप यांनी वसई धर्मप्रांतांच्या प्रमुखपदी फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा (५२) यांची नियुक्ती जाहीर केली. फादर डिसोजा हे वसई धर्मप्रांताचे तिसरे बिशप असून सध्या ते नंदाखाल धर्मग्रामाचे (पॅरीश) प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत होते.
हेही वाचा : भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
वसईच्या चुळणे गावात आनंदोत्सव
फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा हे मुळचे वसईच्या चुळणे गावातील. त्यांची वसईच्या बिशपपदी निवड झाल्याचे भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता जाहीर झाले. ती घोषणा होताच गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थांनी फादर डिसोजा यांच्या घरी अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी केली होती. चुळण्यात फादर थॉमस डिसोजा यांचे आई, दोन भाऊ आणि बहिणी असे कुटुंबिय राहतात. त्यांचे एलायस घोन्साल्विस हे देखील नागपूर धर्मप्रांताचे आर्चबिशप आहेत. एकाच गावातून दोन बिशप नियुक्त झाल्याचे हे दुर्मिळ उदाहरण आहे. त्यामुळे चुळणे गावात आनंद साजरा केला जात आहे.