वसई : नायगाव पश्चिमेच्या कोळीवाडा परिसरात अंत्यसंस्कार करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. विशेषत: विद्युत व्यवस्था नसल्याने रात्रीच्या अंधारात मोबाइल फ्लॅशलाइटच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.

नायगाव पश्चिमेच्या भागात नायगाव कोळीवाडा परिसर आहे. या भागात अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी तयार करण्यात आली आहे. परंतु पालिकेकडून या स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याने या स्मशानभूमीची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. दहन करण्याच्या ठिकाणी पत्रे गेल्या एक ते दीड महिन्यांपासून फुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी हे थेट सरणावर पडून अडचणी येतात. तर दुसरीकडे लाकडेही भिजून जात असल्याने ते पटकन पेट घेत नाहीत. लोखंडी खांब गंजून गेले आहेत. लावलेल्या जाळ्याही मोडकळीस आल्या आहेत. गंजलेले खांब कोणत्याही क्षणी कोसळून अपघात होण्याचा धोका आहे. विजेचीसुद्धा सुविधा नसल्याने रात्रीच्या वेळेस मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना फारच कसरत करावी लागते.

हेही वाचा – वसई : राजीव पाटील यांच्यावर अन्याय नाही; बविआचा दावा, ताकदीने निवडणूक लढवणार

हेही वाचा – वसई: राजीव पाटील यांचा भाजप मधील प्रवेश निश्चित

नुकताच नायगाव कोळीवाड्यातील एक पार्थिव अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आणले होते. विजेची सुविधा नसल्याने स्मशानभूमीत खूप अंधार पसरला होता. नागरिकांनी मोबाइलच्या प्रकाशात, स्कूटरच्या हेडलाईटवर अंत्यविधी करावा लागला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. पालिकेने या परिसरातील स्मशानभूमीकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. पुन्हा अशी वेळ येथील नागरिकांवर येऊ नये यासाठी स्मशानभूमीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची, मागणी येथील नागरिकांनी केली आहे.