वसईतीली एका तरुणीची दिल्लीमध्ये तिच्या प्रियकराने खून केल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मृत तरुणीचे नाव श्रद्धा वालकर तर आरोपीचे नाव आफताब अमीन पूनावाला (२८) असे आहे. आरोपी पूनावालाने श्रद्धा वालकरच खून करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. दरम्यान, या हत्याप्रकरणावर भाजपाचे नेते राम कदम यांनी एक ट्वीट केले आहे. हा खून म्हणजे लव्ह जिहादचे प्रकरण आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे.
“हे प्रकरण लव्ह जिहादचे आहे का? वसईमधील तरुणी श्रद्धाच्या खुनाचा दिल्ली पोलिसांनी तपास करावा. तसेच आरोपी मृत तरुणीचे धर्म परिवर्तन करू इच्छित होता का, हेही तपासावे. श्रद्धाने धर्मांतरास नकार दिल्यामुळेच आरोपीने तिचा खून केला का? या सर्व बाबींची दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी,” अशी मागणी राम कदम यांनी ट्वीटद्वारे केली आहे.
हेही वाचा >>> VIDEO: ठाण्यात शिंदे-ठाकरे गटांत जोरदार राडा, खासदार राजन विचारे यांच्यासमोर कार्यकर्त्यांना मारहाण
नेमके प्रकरण काय ?
मूळची वसई येथील रहिवासी असलेली श्रद्धा वालकरच या २६ वर्षीय तरुणीची तिचा प्रियकर आफताब पूनावालाने हत्या केल्याचे समोर आले आहे. या दोघांमध्ये २०१९ पासून प्रेमसंबंध होते. दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडिलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते.
मार्चमध्ये ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेव्हापासून तिचा कुणाशीही संपर्क नव्हता. तिच्या एका मित्राने तिच्या वडिलांना याबाबत माहिती दिली. श्रद्धाचा फोन तसेच सर्व समाजमाध्यमांची खाती बंद होती. यामुळे तिच्या वडिलांना माणिकपूर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली.
हेही वाचा >>> वसईतील तरुणीची दिल्लीत हत्या; सहा महिन्यांनंतर गुन्हा उघडकीस, प्रियकराने मृतदेहाचे तुकडे करून फेकले
हत्या कशी केली?
श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात भाड्याच्या घरात रहात होते. तिने लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची मेमध्ये गळा दाबून हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. एक बेवसीरिज पाहून त्याने तिच्या हत्येचा कट रचला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, असे पोलिसांनी सांगितले.