वसई : नायगाव पूर्वेच्या बापाणे परिसरात जागेच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी ३ च्या सुमारास ही घटना घडली. यात गोळीबार तीनजण व मारहाणीत तीन असे ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नायगाव पोलिसांनी
गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यासह अन्य सहा जणांना अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी नायगाव पूर्वेच्या बापाणे मौजे चंद्रपाडा सर्वे नं १६७ व १६८ या जागेच्या संदर्भात भोईर परिवार आणि हाऊसिंग एल.एल.पी ग्रुपचे सदस्य यांच्यात वाद होऊन मारामारी झाली होती. याप्रकरणी अनिश सिंग यांच्या तक्रारीवरून भोईर परिवारातील सदस्यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुधवारी सदरच्या जागेच्या ठिकाणी ई साक्ष पंचनामा सुरू होता. याचवेळी दोन्ही गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटात पुन्हा मारामारी झाली. हा वाद विकोपाला जाताच मेघराज याने स्वरक्षणासाठी परवानाच्या बंदुकीने गोळीबार केला. बंदुकीने गोळीबाराच्या तीन फैऱ्या झाडल्या यात हाऊसिंग एल.एल.पी ग्रुपचे सदस्य संजय जोशी, अनिश सिंग, वैकुंठ पांडे हे तीन जण गंभीर जखमी झाले. शुभम दुबे, वीरेंद्र चौबे, राजन सिंग हे तीनजण मारहाणीत जखमी झाले आहेत असे एकूण सहा जण यात जखमी आहेत. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी गोळीबार करणाऱ्या मेघराज भोईर यांच्यासह एकूण सात जणांना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी सांगितली आहे. या गोळीबाराच्या घडलेल्या घटनेमुळे नायगाव परीसरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – Jalgaon Railway Accident : जळगावमधील भीषण रेल्वे अपघातानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “मी जिल्हा प्रशासनाच्या…”

जखमीवर उपचार सुरू

नायगावमध्ये झालेल्या गोळीबारात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात अनिश यांच्या मांडीला गोळी लागल्याने ते यात गंभीर जखमी आहेत. यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याच्या बाहेर आहेत अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा – Jalgaon Railway Accident : “आग लागली, आग लागली असा आवाज आणि…”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला जळगाव रेल्वे अपघाताचा थरार

घटनेनंतर पोलीस तपासाला वेग

नायगावमध्ये दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबार प्रकारामुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी घटनास्थळी व पोलीस ठाण्याला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. याशिवाय पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखेची पथके विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचून आढावा घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai gun firing over land dispute in naigaon 6 injured ssb