लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : ठाण्यातील कळवा खाडीचे पात्र अरूंद झाल्याने ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी शहरातील पावसाळ्यातील पाणी मुंबईला जाण्याऐवजी नायगाव खाडीत येऊ लागले आहे. परिणामी पाण्याचा निचरा होण्याचा वेग मंदावून वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वसई विरार महापालिकेने आता ठाणे महापालिकेशी समन्वय साधून कळवा खाडी रूंद करवून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
वसईत दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. नैसर्गिक नाल्यावर करण्यात आलेले अतिक्रमण, बेकायदा माती भराव व नियोजन शून्य पद्धतीने बांधण्यात आलेली बांधकामे यामुळे शहरात गेल्या काही वर्षांपासून पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे. घरात पाणी घुसणे, वाहतूक ठप्प होणे, जनजीवन विस्कळीत होणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत. ही पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांची नेमणूक केली होती.
या समितीने काढलेले विविध निष्कर्ष आणि त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र ठाण्यातील कळवा खाडी अरूंद झाल्याने ठाणे, कल्याण भागातील पाणी वसईच्या खाडीत येत असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांची भेट घेऊन त्यांना या समस्येची माहिती देऊन त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
नेमकी समस्या काय?
कल्याण, डोंबिवली, ठाणे आदी शहरातील पाणी पावसाळ्यात कळवा खाडीमार्गे मुंबईच्या समुद्राला जात होते. हा पाणी जाण्याचा हा नैसर्गिक आणि पारंपरिक मार्ग होता. पुर्वी खाडी रुंद होती कालांतराने अतिक्रमण, भराव आणि विविध विकासकामे झाली. कळवा पूल,ठाणे कारागृहाचा मागील भागात झोपडपट्टी झाली. त्यामुळे पाणी मुंबईच्या दिशेने जाण्याऐवजी वसईखाडीत येऊ लागले आहे. हे पाणी नायगावच्या खाडीत येते त्यामुळे नायगाव खाडीच्या पाण्याची पातळी वाढत आहे.
परिणामी पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागत असून वसई विरार शहरातील पाणी कायम राहते असे बहुजन विकास आघाडीचे नेते आणि माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील यांनी सांगितले. ही बाब आम्ही निरी समितीच्या निदर्शनास आणून दिली आहे. कळवा खाडीचे रुंदीकरण करून तेथील पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग पुर्वीसारखा केला तर ही समस्या सुटेल असे त्यांनी सांगितले.
.. तर गास, सनसिटी मधील पूर समस्या सुटेल
वसई पश्चिमेकडील सनसिटी, गास, चुळणे आदी गावे पाण्याखाली जात आहेत. याचे कारण म्हणजे नालासोपारा पश्चिमेकडील पाणी हे गास, सनसिटी परिसरा जात असते. तेथून हे पाणी नंतर नायगाव खाडीत आणि तेथून समुद्राला मिळते. पंरतु ठाणे, कल्याणचे पाणी नायगाव खाडीत आल्याने आधीच पाण्याची उंची वाढलेली असते आणि त्यामुळे गास, सनसिटी परिसर अनेक दिवस जलमय राहतो. त्यावर उपाय म्हणून नालासोपारा पश्चिमेचे पाणी कळंब समुद्रात वळविणे गरजेचे आहे.
नालासोपारा पश्चिमेला कळंब समुद्र आहे आहे.शहरातील पाण्याचा प्रवाह कळंब खाडीकडे वळवला तर गास गावाची समस्या सुटेल, असे बैठकीत सांगण्यात आले. आयुक्त अनिल कुमार पवार यांनी ठाणे महापालिकेशी समनव्य साधून कळवा खाडीचे रुंदीकरण करवून घेण्यात येईल असे आश्वासन दिले.