लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई: पोप फ्रान्सिस यांना निधनामुळे वसईत शोककळा पसरली आहे. निधनाचे वृत्त समजताच सर्व उत्सव आणि कार्यक्रम रद्द करण्यात आहे. वसई धर्मप्रांतातील चर्चेस मध्ये विशेष मिस्सेचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच मृत्यू घंटा वाजविण्यात आल्या. वसई धर्मप्रांताच्या बिशपानी शोक संदेश प्रसारित केला आहे

सोमवारी पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. जॉर्ज मारिओ बर्गोग्लिओ या नावाने जन्मलेले पोप फ्रान्सिस हे २०१३ मध्ये पोपपदी निवडले गेले होते. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर जगभर शोक व्यक्त केला जात आहे. वसईच्या धर्मप्रांतात ४५ चर्च आहेत…पोप फ्रान्सिस यांच्या निधनाची बातमी कळताच वसईच्या धर्मप्रांतात शोककळा पसरली. दुपारी सर्व चर्च मध्ये एकाच वेळी मृत्यू घंटा वाजवून शोक व्यक्त करण्यात आला. शोक म्हणून सर्व उत्सव आणि जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आले. संध्याकाळी चर्च मध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते.

पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने कॅथोलिक चर्चमध्ये ‘सेदे वाकांते’ (पोपपद रिक्त) स्थिती निर्माण झाली आहे. लवकरच नव्या पोपची निवड करण्यासाठी कार्डिनल मंडळी एकत्र येणार आहेत.पोप फ्रान्सिस यांच्या जाण्याने निर्माण झालेली शून्यता सहजपणे भरून निघणार नाही. त्यांनी दाखवलेला विनम्रतेचा, करुणेचा आणि परिवर्तनाचा मार्ग ख्रिस्ती समाजासाठी एक दीपस्तंभ राहील. त्यांनी चर्चमध्ये केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचेही वारे आणले होते. जगाने एक महान मार्गदर्शक गमावला आहे आशा शब्दांत वसई धर्मप्रांताचे बिशप फादर फ्रान्सिस डिसोझा यांनी शोक व्यक्त केला आहे.

पोप फ्रान्सिस हे नवीन विचारांचे धर्मगुरू होते.माणूस जगला पाहिजे प्रत्येक माणूस जपला पाहिजे असा संदेश त्यांनी जगाला दिला त्यांचे जाणे हे अत्यंत दुःखद असल्याचे कवी सायमन मार्टिन यांनी सांगितले आहे.

पोप फ्रान्सिस यांची गरिबांचे पोप अशी ख्याती होती.नेहमी न्यायाने चालणारे व उच्च विचार सरणीचे ते गुरु होते त्यांनी प्रत्येक माणसाला व गरिबाला जवळ करीत माणुसकीच्या धर्माची शिकवण दिली. त्यांच्या जाण्याने मोठी हानी झाली आहे.असे फादर निलेश तुस्कानो यांनी सांगितले आहे

पोप यांच्या मृतदेहावर पुढील सोपस्कार पूर्ण केले जातात.

सर्वप्रथम पारंपारिक पद्धतीनुसार त्यांच्या नाकपुड्यांजवळ एक मेणबत्तीची ज्योत धरली जाते व तिचे बारकाईने निरीक्षण करून ती ज्योत थोडीही न हलता स्थिर राहील याची खात्री करून घेतात. ती खात्री पटल्यावर पोपमहाशयांच्या निवासस्थानाचा प्रमुख, एक चांदीची छोटीशी हातोडी घेऊन पोपमहाशयांच्या च्या कपाळावर त्या हातोडीने तीन वे‌ळा हळूवारपणे प्रहार करून पोपमहाशयांच्या पूर्वीच्या (स्नान संस्काराचे वेळी दिलेल्या) नावाने हाक मारून त्यांना विचारतात, (नाव) तुम्ही निधन पावला आहात काय?”

त्यानंतर ते प्रमुख पोपच्या निधनावर शिक्कामोर्तब करतात. यानंतर पोपच्या उजव्या हातातील सोन्याची अंगठी बाहेर काढून उपस्थितांसमोर एका भल्या मोठ्या कैचीने ती अंगी तसेच पोपमहाशयांच्या कार्यालयातील त्यांचा शिक्काही तोडतात. इतके सोपस्कार झाल्यावर मृतदेहाला मोठ्या सन्मानाने अंघोळ घालून त्या शरीरामध्ये रसायने आणि मसाले भरण्यासाठी नेले जाते. निधनानंतर चोवीस तासांनी ही प्रक्रिया केली जाते. तत्पूर्वी त्या मृतदेहातील रक्त व पाणी संपूर्णपणे बाहेर काढले जाते. शेवटी मृतदेहावर पोपमहाशयांचा पोशाक चढवून, मृतदेह शवपेटीत ठेऊन सदर शवपेटी अंत्यसंस्कार पूर्ण होईपर्यंत स्वीच गार्डच्या ताब्यात दिली जाते.