वसई- जमिनीच्या प्रकरणात बाजूने निकाल देण्यासाठी २० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी मांडवीचे वनक्षेत्रपाल संदीप चौरे याच्यासह दोघांवर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचेच्या रकमेचा १० लाखांचा पहिला हफ्ता घेण्यासाठी ते दोघे वसईत आले होते. मात्र सापळ्याची कुणकूण लागताच ते पसार झाले.
तक्रारदार यांच्या मालकीची ७ गुंठे जागा वसईतील सासूपाडा येथे आहे. २००७ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनविभागाने ही जागा ताब्यात घेऊन सील केली होती. हे प्रकरण मांडवी परिक्षेत्राकडे प्रलंबित होते. या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करून ती परत मिळवून देण्याचे आश्वासन मांडवी परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल एस.टी.चौरे यांनी दिले होते. त्यासाठी २० लाखांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या लाचेच्या रकमेचा १० लाखांचा हप्ता स्वीकारण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी चौरे आणि त्याचा साथीदार असेलला खासगी इसम चंद्रकांत पाटील हे दोघे मंगळवारी दुपारी वसई पूर्वेतील एव्हरशाईनसिटीत आले होते. तेथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला होता. मात्र त्याची कुणकूण लागताच चौरे पैसे न स्वीकारता निघून गेला.
हेही वाचा – वसई : बोळींज म्हाडा घरांच्या स्वस्ताईवर आधीचे खरेदीदार नाराज, फसवणूक केल्याचा आरोप
हेही वाचा – शहरबात : छडी वाजे छम छम…
या प्रकरणात चौरे याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याच्या कलम ७,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पालघरच्या लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हर्षल चव्हाण यांनी दिली.