लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : बुधवारी सकाळी वसईच्या चुळणे गावातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलीं आणि त्यांची घरकाम करणार्‍या मदतनीस मुलीचा ४८ तास उलटूनही शोध लागलेला नाही. बुधवारी संध्याकाळी बोरीवली स्थानकात या मुली दोन मुलांसह तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसून आल्या होत्या. ही दोन्ही मुले गावातील तबेल्यात काम करणारी आहेत. या मुलींच्या शोधासाठी माणिकपूर पोलिसांनी ४ पथके स्थापन केली आहेत.

वसईच्या चुळणे गावात राहणार्‍या १३ आणि १५ वर्षांच्या दोन सख्ख्या बहिणी तसेच त्यांच्या घरात काम करणारी १५ वर्षीय मदतनीस मुलगी बुधवार पहाटेपासून बेपत्ता होते. या मुलींच्या वडिलांचा गाईंचा तबेला आहे. या तबेल्यात काम करणार्‍या मुलांसोबत मुली घर सोडून गेल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. मात्र या घटनेला ४८ तासांनंतरही वसईतील तीन मुलींचा शोध पोलिसांना लागलेला नाही. यामुळे मुलींचे पालक चिंतातूर असून गावात या प्रकरणामुळे सुतकी वातावरण आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस, गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी ४ स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे या मुलींचा माग काढण्यात येत आहे.

आणखी वाचा-दिल्लीतून वाहनांची चोरी, इंजिन क्रमांक बदलून देशभर विक्री; आंतराराज्य टोळीला अटक

बोरीवली स्थानकातील सीसीटीव्हीत दिसल्या..

या प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती देताना माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितले की, बुधवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास या मुली बोरीवली स्थानकात उतरताना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसल्या. काही वेळाने त्या पुन्हा विरार ट्रेनमध्ये चढताना दिसल्या. त्यापैकी एक मुलगी वसई स्टेशनवर ट्रेनमधून उतरताना दिसली पण ती पुन्हा त्यात चढली आणि पुढे हे सर्व विरारच्या दिशेने निघाले. तेथून ते उतरताना दिसले नाहीत. त्यामुळे त्याच ट्रेनने त्या मुंबईच्या दिशेने निघाल्या असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. तबेल्यात काम करणार्‍या मुलाकडे मोबाईल फोन होता. मात्र सकाळपासून तो बंद आहे. मुलींनी घर सोडताना कुठलीही मौल्यवान वस्तू, दागिने अथवा रोख रक्मक नेलेली नाही. घर सोडून गेल्यापासून त्यांच्या पालकांना कुणाचाही फोन आलेला नाही. आम्ही मुलींच्या मागावर असून लवकरच त्यांना शोधून या प्रकरणाचा उलगडा करू अशा विश्वास माणिकपूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai minor girls missing case spotted on cctv along with two boys at borivali station mrj
Show comments