लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वाढत असल्याने अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने जोरदार कारवाई सुरू केली आहे. गुरुवार पासून सुरू झालेल्या या कारवाईत दीड लाख हजार चौरस फुटांची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

वसई विरार शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहू लागले आहेत विशेषतः यात बैठक चाळी औद्योगिक स्वरूपाचे गाळे तयार होऊ लागले आहेत या वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे शहराचे विद्रूपीकरण व बकालीकरण होऊ लागले आहे.या वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पालिकेकडे तक्रारी येत असल्याने अखेर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवार पासून जोरदार कारवाई सुरू केली आहे.

आणखी वाचा-घरफोडी करणार्‍या आरोपीला २४ तासात बेड्या

गुरुवारी पहिल्या दिवशी प्रभाग समिती जी मधील ससुनवघर सर्व्हे क्रमांक १७५ येथील २५ हजार चौरस फुटांचे तीन गाळे, कामण आयशा कंपाउंड येथे ६० हजार चौरस फुटांचे ७ गाळे अशी ८५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे. तर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही पालिकेने कारवाई सुरूच ठेवली.

या कारवाईत बापाणे सर्व्हे क्रमांक ४२,४३ येथे ३० हजार चौरस फुटांचे १३ गाळे व खानिवडे येथे सर्व्हे क्रमांक ५९ मध्ये ३० हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. मागील दोन दिवसात १ लाख ४५ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले आहे. सदरची कारवाई सहायक आयुक्त मोहन संखे, मीनाक्षी पाटील, कनिष्ठ अभियंता कौस्तुभ तामोरे,अरुण सिंग,जितेश पाटील ,मनीष पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे.

Story img Loader