वसई- वसई विरार महापालिकेने सुशोभीकरण करण्यासाठी नाक्यांवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकले आहेत. त्याचा मोठा परिणाम पोलिसांच्या तपासावर येत आहे.
वसई विरार महापालिकेने शहराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी विविध कामे हाती घेतली होती. त्याअंतर्गत शहरातील चौकांचे सुभोभीकरण, सौंदर्यशिल्प, कारंजे तयार करणे आदी कामांचा समावेश होता. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र हे सुभोभीकरण करताना चौकांमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात आले होते. ते कॅमेरे नव्याने लावण्याची आवश्यकता होती. परंतु पालिकेने कॅमेरे पुन्हा लावले नाहीत. कॅमेरे नसल्याने पोलिसांच्या तपासात अडथळे येऊ लागले आहेत. नुकताच वसईच्या मंयक ज्वेलर्सवर दरोडा घालण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींचा पोलीस सीसीटीव्हीचा माग काढून शोध घेते होते. मात्र चुळणे येथील नाक्यावरील कॅमेर काढल्याने पोलिसांचा तपास खुंटला आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्यांनी दिली.
हेही वाचा – सैफ प्रकरणानंतर बांगलादेशींची धरपकड सुरू, मिरा रोडमधून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक
आरोपींचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे हे अत्यंत महत्वाचे ठरतात. नागरिकांच्या सहभागातून शहरात जागोजागी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुशोभिकरण करताना काढण्यात आले आहेत. ते पुन्हा बसविण्यात आले नाही, असे पोलीस अधिकार्याने सांगितले.
सुशोभीकरण आवश्यक आहे मात्र त्यापेक्षा नागरिकांची सुरक्षा महत्वाची आहे. यासाठी पालिकेने काढलेले कॅमेरे तात्काळ लावावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा – नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
एक कॅमेरा मोहीम थंडावली
वसई – विरार शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून सोनसाखळी चोरी, वाहनांची चोरी, दरोडा, महिलांवरील अत्याचार, खून, अपघात यासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे प्रकार घडत असतात. त्यामुळे २०२८ मध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी एक कॅमेरा शहरासाठी ही मोहीम सुरू केली होती. नागरिकांच्या सहभागातून कॅमेरे लावण्यात आले होते. मात्र आता ही मोहीम थंडावल्याने सीसीटीव्ही कॅमेरे कमी झाले आहेत.