वसई: नायगाव उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट खाली कोसळून अपघात घडला आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. तुषार जोगळे (३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या पुलावरून कोसळून अपघात होण्याची दुसरी घटना आहे.

नायगाव पुर्व व पश्चिमेला जोडणारा नायगाव उड्डाणपूल आहे.या उड्डाणपुलावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. रविवारी सायंकाळच्या सुमारास एम एच ४८ सी डब्ल्यु ८२५८ या दुचाकीवरून तुषार व त्यांचे दोन सहकारी नायगाव वरून उमेळाफाटा येथे भरधाव वेगाने जात असताना वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि थेट दुचाकी ही पुलावरून खाली कोसळली यात तुषार जोगळे (३०) याचा जागीच मृत्यू झाला. तर सुजल मालपेकर (१९) व सचिन सुतार (३५) हे गंभीर जखमी झाले आहे. हे तिघे ही नायगाव पूर्वेच्या चंद्रपाडा येथे राहत आहेत. याप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या नायगाव उड्डाणपूलावरून खाली कोसळून अपघात होण्याची दुसरी घटना आहे. यापूर्वी नायगाव पश्चिमेच्या वडवली परिसरात राहणारा अतुल दुबळा (२०) याचा दुचाकीवरून जात असताना अपघात घडला. व त्याची दुचाकी थेट कठड्याला धडकली यात तो थेट पुलावरून खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला आहे.

पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

नायगाव पुर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील सुरक्षा कठडे हे कमी उंचीचे आहेत. अपुऱ्या असलेल्या कठड्यामुळे सातत्याने दुचाकीस्वार थेट खाली कोसळून अपघाताच्या घटना समोर येत आहेत. आतापर्यंत दोन तरुणांचा उड्डाणपुलावरून कोसळून मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पुन्हा एकदा कठड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे

Story img Loader