वसई: रविवारी पार पडलेली १२ वी वसई विरार मॅरेथॉन स्पर्धा साताऱ्याचा कालिदास हिरवे याने जिंकली. २ तास १८ मिनिटे १९ सेकंदात ४२ किमीची धाव पूर्ण करीत त्याने विजेतेपद पटकावले. २१ किमीच्या अर्ध मॅरेथॉन महिला गटात सोनिका परमार व पुरुष गटातून रोहित वर्मा यांनी बाजी मारली आहे. १६ हजाराहून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
वसई विरार महापालिकेची १२ वी राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. सकाळी साडेपाच वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली होती. या स्पर्धेत देशभरातील विविध ठिकाणचे हजारो धावपटू यात सहभागी होऊन ५ किमी, १० किमी, २१ किमी, ४२ किमी अंतर पूर्ण केले. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी विविध ठिकाणच्या मार्गावर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे धावणाऱ्या स्पर्धकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व महिला वर्ग सहभागी होत त्यांनीही सामाजिक संदेश दिले.
हेही वाचा – ऑनलाईन जुगार हरल्याने झाला कर्जबाजारी, मिरा रोडमधील तरुण बनला चोर
४२ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये साताराचा धावपटू कालिदास हिरवे ठरला सुवर्णपदक विजेता, तर प्रदीपसिंग चौधरी द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य आणि मोहित राठोड कांस्य पदक विजेते ठरले. तर महिलांच्या २१ किमी अर्ध मॅरेथॉन स्पर्धेमधे हरियाणाची सोनिका परमार प्रथम, भारती नैन द्वितीय आणि साक्षी जड्याल तृतीय क्रमांक पटकावला. तर पुरुष गटातून रोहित वर्मा याने प्रथक तर नितीशकुमार रथवा द्वितीय व दीपक कुंभार याने तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व मेडल देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी मॅरेथॉन सदिच्छादूत (इव्हेंट ॲम्बेसेडर) म्हणून
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुवर्णपदक विजेती साक्षी मलिक उपस्थित होती.
तसेच स्पर्धेसाठी पालघरचे खासदार डॉ हेमंत सवरा, नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक, वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, माजी महापौर राजीव पाटील, माजी खासदार बळीराम जाधव, शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका किरण चेंदवणकर, विनायक निकम, भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, मनोज पाटील, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, संजय हेरवाडे यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल
४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन स्पर्धा
कालिदास हिरवे – २ तास १८ मिनिटे १९ सेकंद
प्रदीप चौधरी – २ तास १८ मिनिटे २४ सेकंद
मोहित राठोड – २ तास १९ मिनिटे ६ सेकंद
अर्ध मॅरेथॉन स्पर्धा (महिला)
सोनिया परमार– १ तास १३ मिनिटे १२ सेकंद
भारती नैन – १ तास १३ मिनिटे ५१ सेकंद
साक्षी जड्याल- १ तास १४ मिनिटे २१ सेकंद
अर्ध मॅरेथॉन (पुरुष)
रोहित वर्मा – १ तास ३ मिनिटे १२ सेकंद
नितीशकुमार रथवा – १ तास ३ मिनिटे १३ सेकंद
दीपक कुंभार- १ तास ३ मिनिटे सेकंद