वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तयार करण्यात आलेल्या नवीन वर्सोवा पुलावर वाहने उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता. अखेर त्या ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घातली असून तशी अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. जुना वर्सोवा पूल धोकादायक बनल्याने महामार्ग प्राधिकरणाने नवीन वर्सोवा पूल तयार केला आहे. नवीन वर्सोवा वाहतुकीला खुला झाल्यानंतर वर्सोवा पुलाजवळच्या परिसरात होणारी वाहतूक कोंडी ही कमी झाली आहे. मात्र तयार करण्यात आलेल्या नवीन पुलाच्या दोन्ही मार्गिकेवर अवजड वाहने उभी केली जात आहेत. तर दुसरीकडे काही अतिहौशी नागरिक ही वाहने मध्येच थांबवून सेल्फी काढणे, छायाचित्रण करणे असे प्रकार समोर येत आहे. वाहने मध्येच उभी राहत असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक लागून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत दैनिक लोकसत्ता ने वृत्त प्रसारित करून ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
अखेर मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाने नवीन वर्सोवा पुलावर वाहने थांबविण्यास बंदी घातली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त (वाहतूक) सुहास बावचे यांनी अधिसूचना जारी केली असून त्यात मुंबई-ठाणे बाजूकडून गुजरात बाजूकडे जाणारे व गुजरात बाजूकडून मुंबई कडे येणाऱ्या नविन पुलावर दोन्ही वाहिनीवर वाहन थांबण्यास बंदी (नो-पार्किंग) केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या नवीन वर्सोवा पुलावर आता वाहने थांबविल्यास त्यांच्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
पुलावर टपऱ्यांचे अतिक्रमण
नवीन तयार करण्यात आलेल्या वर्सोवा पुलावर मुंबईहून वसईकडे येताना पूल सुरू होताच पुलावर अतिक्रमण करून टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. या टपऱ्याच्या ठिकाणी अनेक वाहन चालक सिगारेट व अन्य अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी थांबतात अनेकजण वाहने मध्येच उभी करतात. त्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांची धडक लागून अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी पुलावर होत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.