वसई : नैसर्गिक वनसंपदा असलेल्या पालघर जिल्ह्यातील वनक्षेत्र तब्बल ८७ चौरस किलोमीटर घटले आहे. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ (आयएसएफआर) अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. भूमाफियांकडून होणारे भराव, बांधकामे आणि झांडाची कत्तल होत असल्याने हिरवा पट्टा नष्ट होऊ लागला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यातील २४ जिल्ह्यातील १ हजार ७७८ वनक्षेत्र घटले असून त्यात सर्वाधिक घट ही पालघर जिल्ह्यातील आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालघऱच्या पश्चिमेला सागरी किनारा, पूर्वेकडे डोंगर असल्याने हा जिल्हा निसर्गरम्य आणि पर्यटनासाठी ओळखला जातो. पालघर जिल्ह्यातील नैसर्गिक जंगलामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांनी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करून अनधिकृत बांधकामे करण्यास सुरवात केली आहे. वनखात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे होत आहे. यामुळे जिल्ह्यातील हिरवा पट्टा नष्ट होऊ लागला आहे. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ (आयएसएफआर) या संस्थेने राज्यातील वनक्षेत्राच्या सद्यस्थितीचा अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालातून हे भीषण वास्तव समोर आले आहे.

हेही वाचा : वसईतील मयंक ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; सराफ मालक जखमी, लाखोंची लूट

पालघर जिल्ह्यात वन क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार आहे. पर्यावरणाच्या अनुषंगाने जंगलाचे व पशुपक्ष्यांचे संवर्धन व्हावे, म्हणून वन विभागामार्फत एकूण २४८.३८ चौरस किलोमीटर राखीव क्षेत्राची घोषणा वनविभागाने केली होती. त्यानुसार जव्हार (११८.२८) डहाणू ( ४९. १५) आणि धामणी येथे धामणीमध्ये (८०.९५) चौरस किलोमीटर राखीव वनक्षेत्रे आहेत. याशिवाय पालघर, वसई, तलासरी, डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा तालुक्यात वनहक्क पट्ट्यांचे क्षेत्र २८ हजार ९०० हेक्टर इतके आहे. मात्र भू माफियांनी अनधिकृत बांधकाम करण्यासाठी मोठ्या प्रमाणवर जंगलतोड करून वनक्षेत्रावर कब्जा केला आहे. त्यामुळे ८७ चौ.कि.मी. म्हणजेच एकूण वनक्षेत्राच्या ३५ टक्के वनक्षेत्र घटले आहे.

वसई विरार मधील वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण

वसई विरार मध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहे. त्यात सर्वाधित बांधकामे ही वनखात्याच्या जागेवर होत आहेत. राजवली, वाघरळ पाडा येथे वनखात्याच्या जमिनीनवर जंगलतोड करून मोठमोठ्या अनधिकृत वसाहती उभ्या राहिल्या आहेत.

हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय

राज्यातील २४ जिल्ह्यांनी वनक्षेत्र गमावले

महाराष्ट्र देशातील सर्वाधिक म्हणजे १४,५२५ चौ.कि.मी इतके सर्वात जास्त वृक्षाच्छादन आहे. ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ (आयएसएफआर) अहवालानुसार २०२१ ते २०२३ या दोन वर्षात राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांनी एकूण १ हजार ७७८ चौ.कि.मी. खुले जंगल आणि २६७ चौ.कि.मी. झुडपी जंगल गमावले आहे. त्यात सर्वाधिक ८७ चौरस किलोमीटर वनक्षेत्र पालघर जिल्ह्यातील घटले आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai palghar forest area declined by 35 percent india state of forest report css