वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावर एका पादचार्याला धडक देऊन फरार झालेल्या ट्रकचालकास पेल्हार पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. महामार्गावरील ६० हून अधिक सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आला आहे. मंगळवार १६ एप्रिल रोजी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात वाहनाने एका ३५ वर्षीय इसमाला धडक दिली होती. जखमी होऊन तो इसम रस्त्यावर पडला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक फरार झाला होता. याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोदातत कलम ३०४ (अ), २७९, ३३७,३३८ अन्वये गुन्हा दाखल होता. मयताची ओळखही पटलेली नव्हती. मात्र आरोपीला पकडण्यासाठी पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी कंबर कसली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने फरार वाहनचालकाचा शोध सुरू केला.
हेही वाचा : पालघर लोकसभेसाठी बविआने कंबर कसली, प्रत्येक कार्यकर्त्याने उमेदवार समजून कामाला लागण्याचे आदेश
महामार्ग परिसरातील ६० ते ७० सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी तपासले. त्यावेळी एक ट्रक ठोकर मारून जाताना दिसला. त्या ट्रकच्या वर्णन आणि नंबर वरून पोलिसांनी माग सुरू केला. हा ट्रक पंजाब येथील असल्याचे निष्पन्न झाले. पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षख सोपान पाटील आणि त्यांच्या पथकाने पंजाब येथे जाऊन ट्रकचलाक आरोपी सूरजित सिंग (५९) याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुमारगौरव धादवड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे आदींच्या पथकाने कारवाई करून या ‘हिट ॲण्ड रन’ च्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.