वसई : समुद्रकिनारी चारचाकी वाहने घेऊन हुल्लडबाजी करणे निष्काळजीपणे वाहने चालविणे अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. नुकताच भुईगाव समुद्रकिनारी समुद्रात अडकून पडलेल्या गाडी मालकाच्या विरोधात वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वसई पश्चिमेतील परिसरात विस्तीर्ण असे समुद्रकिनारे आहेत, तसेच आजूबाजूचा परिसर हा निसर्गरम्य असल्याने वसई विरार शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. अर्नाळा, नवापूर, भुईगाव, राजोडी, सुरुची, कळंब, रानगाव आदी समुद्रकिनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मौज मज्जा करण्यासाठी या किनाऱ्यावर मोठय़ा संख्येने पर्यटक येत असतात.

परंतु काही समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या काही पर्यटकांमार्फत मद्यपान करून हुल्लडबाजी केली जात असते. या हुल्लडबाजीमुळे याचा फटका या ठिकाणी मौजमजा करणाऱ्या पर्यटकांना बसत असतो. तर काही पर्यटक हे थेट वाहने घेऊन समुद्रकिनाऱ्यावर जात असतात. तर काही जण स्टंटबाजीसुद्धा करीत असतात, अशा प्रकारामुळे गाडय़ा समुद्रात अडकून पडल्याच्या व किनाऱ्यावर अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकताच २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी भुईगाव समुद्रात चारचाकी वाहन अडकून पडले होते. भरतीच्या पाण्यामुळे ते वाहन जास्त आत खेचले गेले होते. त्यामुळे ते वाहन बाहेर काढण्यास ही अडचणी निर्माण होत होत्या. दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता जेसीबीच्या साहाय्याने हे वाहन पोलीस व स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. चालकाने दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असल्याने वसई पोलिसांनी चालकाच्या विरोधात वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ यांनी दिली आहे. अशा प्रकारे वाहने समुद्रकिनारी घेऊन जाऊन स्वत:चा व इतर पर्यटकांचा जीव धोक्यात घालत आहेत. अशा प्रकाराला आळा घालावा यासाठी आता थेट कारवाईला सुरुवात करण्यात आल्याचे पवळ यांनी सांगितले आहे.

भुईगाव समुद्रकिनारी पर्यटकांनी गाडी नेल्याने थेट ती आत ओढली गेली होती. शर्थीचे प्रयत्न करून गाडी बाहेर काढण्यात आली. असे प्रकार समुद्रकिनारी सातत्याने होत असतात. त्यामुळे जे वाहनचालक हुल्लडबाजी करीत आपली वाहने समुद्रकिनारी नेत आहेत. त्यांच्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. 

ऋषिकेश पवळ, पोलीस निरीक्षक वसई पोलीस ठाणे</strong>

Story img Loader