लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

वसई : वसई रोड रेल्वे टर्मिनसला मंजुरी मिळाल्याची घोषणा करून राजकीय पक्षाचे नेते प्रसिध्दी मिळवत असले तरी अद्याप रेल्वे मंडळाने त्याला परवानगीच दिलेली नाही. पश्चिम रेल्वेने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रातून ही बाब उघड झाली आहे.

वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस बनवावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासी करत आहेत. २०१८ मध्ये तत्कालीन केंंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी पुन्हा रेल्वे टर्मिनसची घोषणा करून २०२३ पर्यंत टर्मिनस पूर्ण केले जाणार असल्याचेही जाहीर केले होते. याबाबत पश्चिम रेल्वेने दोन टप्प्यात रेल्वे टर्मिनस तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. पहिल्या टप्प्यात किमान बांधकामांचा वापर करून काही भागाचा विकास आणि दुसर्‍या टप्प्यात पुर्ण टर्मिनस विकसित केले जाणार होेते. यासाठी ३०० हेक्टर जागा हस्तांतरीत करावी लागणार होती. मात्र विविध अडचणींमुळे ते काम झाले नव्हते.

जागा कमी असल्याने नायगाव वसई दरम्यान दिवा मार्गाजवळ किंवा वसई पूर्वेकडे इंडियन ऑइल समोर मिनी रेल्वे टर्मिनस तयार केले जाणार होते. दरम्यान वसईत रेल्वे टर्मिनसला मंजूर मिळाल्याचे सांगत भाजपाच्या नेत्यांनी स्वत:ची प्रसिध्दी देखील करवून घेतली होती. मात्र अशा कुठल्याही रेल्वे टर्मिनसला मंजुरी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या उपमुख्य प्रबंधक संदीप श्रीवास्तव यांनी मुख्यमंत्री कार्यालययाला पाठवलेल्या पत्रात वसई रेल्वे टर्मिनसचा केवळ प्रस्ताव रेल्वे मंडळाच्या मान्यतेखाली असल्याचे सांगितले आहे. रेल्वे मंडळाकडून मंजुरी मिळेल तेव्हा हे काम केले जाईल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रामुळे भाजपाचा खोटेपणा उघडा पडला आहे. प्रसिध्दीपेक्षा त्यांनी रेल्वे टर्मिनसला मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आप पक्षाचे जॉय फरगोस यांनी सांगितले.

रेल्वे मंत्र्यांनी वसई टर्मिनसला मंजुरी दिली आहे. रेल्वे मंडळाची परवानगी ही प्रक्रियेचा भाग आहे. काम लवकर सुरू होऊन वसईत रेल्वे टर्मिनस बनेल, असे पालघरचे खासदार डॉ हेमंत सवरा यांनी सांगितले.

…म्हणून वसईत रेल्वे टर्मिनसची गरज

वसईतून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेरगावी प्रवास करत असतात. परंतु येथील नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी वांद्रे, कुर्ला, दादर आणि सीएसटी रेल्वे स्थानकात जावे लागते. पश्चिम रेल्वेमधून दररोज १०३ लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा असते. त्यापैकी दररोज ४३ ट्रेन या मुंबई सेंट्रल स्थानक आणि वांद्रे टर्मिनस स्थानकातून सुटत असतात. या सर्व गाड्या वसई रोड रेल्वे स्थानकातून जात असतात. याशिवाय ६० लांब पल्ल्यांच्या गाड्या या वसई स्थानकात बदलत असतात. त्यामध्ये उत्तरेकडे जाणाऱ्या तसेच मध्ये रेल्वेत जाणार्‍या रेल्वे गाड्यांचे इंजिन बदलले जात असते. या प्रक्रियेला ५० मिनिटांहून अधिक वेळ लागत असतो. या शिवाय दररोज ४० मालगाड्या वसई स्थानकातून जात असतात. त्यामुळे वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस बनवावे अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. वसई टर्मिनस तयार झाल्यास पश्चिम रेल्वेवरील इतर टर्मिनस वरील ताण देखील कमी होण्यास मदत होणार होती.