वसई : वसई विरारला पाणी पुरवठा करणार्‍या सुर्या योजनेच्या कवडास जलशुध्दीकरणातील रोहित्र पुन्हा बंद पडल्याने पुन्हा एकदा पाणी संकट निर्माण झाले आहे. मागील आठवड्यात याच रोहित्राच्या बिघाडामुळे पाणीपुरवठा ६ दिवस बंद होता. हा बिघाड दुरूस्त करण्याचे काम सुरू असून पालिकेने टॅंकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे.

वसई-विरार शहर महानगरपालिकेला सुर्या पाणी प्रकल्प योजनेतून २०० दशलक्ष लिटर्स आणि एमएमआरडीएच्या सूर्या पाणी प्रकल्प योजनेतून १४० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेच्या कवडास पंपिंग स्टेशन आणि सूर्या नगर जलशुद्धीकरण केंद्रातील रोहित्रामध्ये मंगळवार २५ मार्च रोजी बिघाड झाला होता. त्यामुळे योजनेचा वीजपुरवठा पुर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे मागील आठवड्यात मंगळवारपासून वसई विरार शहरात मोठे पाणी संकट निर्माण झाले होते.

या काळात वसईकरांना केवळ सुर्या योजनेच्या जुन्या योजनेतून कमी दाबाने अनियमित पाणी पुरवठा करण्यात येत होता. हे रोहित्र दुरूस्त होत नसल्याने अखेर ते गुजराथ जिल्ह्याच्या वापी येथे पाठविण्यात आले होते. रविवारी संध्याकाळी रोहित्र दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. सोमवारी पहाटे हा पाणीपुरवठा सुरू झाला होता. सोमवारी नागरिकांना पाणी मिळण्यास सुरवात झाली होती. मात्र संध्याकाळी ६ वाजता पुन्हा या रोहित्रात बिघाड झाला आणि वीज पुरवठा ठप्प झाला. परिणामी एमएमआरडीएच्या योजनेतून होणारा १४० दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा पुर्णपणे बंद झाला आहे. यामुळे शहरात पुन्हा पाणी संकट निर्माण झाले आहे. हा बिघाड दुरूस्त करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहे. सलग दुसर्‍या आठवड्यात वसईकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे.

दुसर्‍यांदा पाणी संकट निर्माण झाल्याने पालिकेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सकाळपासून कवडास येथे दुरूस्तीच्या कामात आहे. मंगळवार संध्याकाळ पर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण झाले नव्हते.

सध्या महापालिकेच्या सूर्या धरणाच्या नवीन आणि जुन्या योजनेतून होणारा एकूण दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद असल्याने वसई-विरार शहरात होणारा पाणी पुरवठा अपुऱ्या व कमी दाबाने सुरू आहे, असे पालिकेचे उपायुक्त समीर भूमकर यांनी सांगितले. उपाययोजना म्हणून ज्या झोपडपट्टी भागात जलवाहिनीव्दारे पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही अशा भागात महापालिकेमार्फत टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.