वसई– वसई विरार शहराला सुर्या पाणी प्रकल्पातून अतिरिक्त पाणी देण्यास सुरवात झाली आहे. उद्घटानामुळे लांबलेले पाणी अखेर आंदोलनांमुळे उद्घटन न करता देण्यास आले आहे. वसई विरारकरांना पाणी मिळू लागल्याने आता त्याचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई विरार शहराला सुर्या प्रकल्पातून १८५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्याची योजना एमएमआरडीएने तयार केली होती. या पाण्याला होणारा विलंब आणि दुसरीकडे पाणी टंचाईमुळे नागरिकांचे होणारे हाल यामुळे राजकारण पेटले होते. राजकीय श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन करण्यासाठी पाण्याचे वितरण थांबवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. शिवसेना ठाकरे गटाने थेट एमएमआरडीएवर मोर्चा काढला तर भाजप, शिवसेना मनसेने मोर्चे काढले. परिवर्तन संघटनेच्या मयुरेश वाघ आणि खासदार राजेंद्र गावित यांनी पाच जलआक्रोश मोर्चे काढले होते. आगरी सेनेच्या ३ महिलांनी तर आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर ६ व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पाणी सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले. आगरी सेनेचे आंदोलन या प्रकरणी निर्णायक ठरले होते. आता चाचणीनंतर पाणी सुरू करण्यात आले असून टप्प्या टप्प्याने हे पाणी नागरिकांना मिळणार आहे.

हेही वाचा >>> करोनाकाळात उभारलेले प्राणवायू प्रकल्प पडून; साथीनंतर मागणी नसल्याने महापालिकांसमोर देखभालीचा प्रश्न

पाणी आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी श्रेय घेण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पाणी लांबणीवर पडल्याचा आरोपामुळे भाजप आक्रमक झाला आहे. खासदारांनी पंतप्रधानां उदघटान करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ते झाले नसल्याने पंतप्रधांनावर टिका होऊ लागली. पाणी प्रकरणात पतंप्रधानांची बदनामी होत असल्याने याप्रकरणी पालिकेने श्वेतपत्रिका काढून खरी परिस्थिती समोर आणावी अशी मागणी भाजपाचे उपजिलाध्यक्ष आणि प्रवक्ते मनोज बारोट यांनी केली आहे.

गावितांनी मानले सर्वांचे आभार

वसईकरांना पाणी मिळावे यासाठी सर्वच पक्ष संघटना प्रयत्नशील होते. यासाठी मी अनेकदा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता असे खासदार गावित यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचे श्रेय केवळ एकाचे नसून सर्वाचे आहे, असे सांगत त्यांनी पाणी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

बविआ भविष्यातील प्रकल्पांच्या मागे

राजकीय श्रेय घेण्याच्या चढाओढीत नसणार्‍या बविआने मात्र शांतपणे काम सुरू ठेवले आहे. १९९६ पासून पाणी प्रकल्पासाठी आमदार हितेंद्र ठाकूर काम करत होते. आम्ही पत्रकबाजी न करता प्रत्यक्ष काम करत आहोत. राजकारणी श्रेयवादात अडकले आहेत आम्ही मात्र भविष्यातील खोलसापाडा, देहर्जी प्रकल्पाच्या कामाच्या मागे लागलेलो आहोत, असे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai residents started getting additional water from surya dam project zws