वसई : वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात जुनी व नवीन वाहने विक्रीसाठी थेट रस्त्यावर ठेवली जात आहेत. तर दुसरीकडे गॅरेज दुरूस्तीची कामेही रस्त्याच्या मध्येच केली जात असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. अशा प्रकारे रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरिकरण झपाट्याने वाढले आहे. त्यातच वाहनांची संख्याही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. आधीच रस्ते अपुरे आहेत त्यातच रस्त्यावर जुनी व नवीन वाहने विक्रीसाठी ठेवून रस्ते अडविले आहेत तर काही ठिकाणी रस्त्याच्या मध्येच गॅरेज दुरुस्तीची कामे केली जाऊ लागली आहे. विशेषतः आता दसरा दिवाळीचा सण येत असल्याने विविध ठिकाणच्या भागात वाहनांचे बाजार लागले आहेत. विक्रीसाठी वाहने थेट रस्त्याच्या मध्येच ठेवली जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – दहिसर टोल नाक्याजवळील महामार्गावर १६ तासापासून गाय मृत अवस्थेत पडून, प्रशासनाचे दुर्लक्ष

विशेषतः वसई पश्चिम येथील अंबाडी मुख्य रस्ता तसेच शंभर फुटी रस्ता हा रेल्वे स्थानकाला लागून आहे. या भागात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आस्थापने, भाजी मार्केट, शैक्षणिक संस्था असल्याने तालुक्याच्या विविध भागांतून नागरिक कामानिमित्ताने आपली वाहने घेऊन येत असतात. तसेच वसई औद्योगिक वसाहत आणि मुंबईला जाणाऱ्या खासगी बसेसही मोठ्या संख्येने या रस्त्यावर उभ्या केल्या जात असतात. याशिवाय दिवसभर या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यांच्या दोन्ही बाजूस अनधिकृत गॅरेज व वाहने खरेदी-विक्रीच्या व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे दिवसभर या रस्त्यावर वाहतूक कोंडी असते. त्यांचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. या संदर्भात नागरिकांनी वाहतूक पोलीस व वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘एच` यांना वारंवार लेखी तसेच तोंडी तक्रारी दिलेल्या आहेत. मात्र त्यानंतरही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप वसई भाजप निवडणूक प्रमुख मनोज पाटील यांनी केला आहे.

आधीच नागरिकांना जागा नसते त्यात अशा प्रकारे रस्त्यावर गॅरेज दुरूस्ती व वाहने विक्रीसाठी उभी करून एक प्रकारे सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक केल्याचा हा प्रकार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. या अतिक्रमणावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाहनतळ नसल्याने अडचणी

वसई विरार महापालिकेने शहरात वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ तयार केली नसल्याने वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना अडचणी येतात. अनेकदा रस्त्याच्या कडेला उभी केलेली वाहने टोइंग करून उचलली जातात याचा फटका नागरिकांना बसतो. तर दुसरीकडे मात्र मुख्य रस्त्यांचे भाग अडवून सर्रास पणे वाहन विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यावर कोणतीच कारवाई होत नाही. यासाठी रस्त्याच्या लगतचा काही भागांचे नियोजन करून त्या ठिकाणी पे अँड पार्कची सुविधा करा जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना तरी दिलासा मिळेल अशी मागणी मनोज पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा – दहिसर टोल नाक्याजवळील महामार्गावर १६ तासापासून गाय मृत अवस्थेत पडून, प्रशासनाचे दुर्लक्ष

वाहतुकीला अडथळे निर्माण करणाऱ्यावर कारवाई करणार

रस्त्यावर वाहने उभी करणे, गॅरेज चालविणे अशा प्रकारामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. तसेच वाहने विक्रीसाठी ठेवत आहेत त्यांनाही नोटिसा बजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. असे वाहतूक शाखा परिमंडळ २ वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश शेट्ये यांनी सांगितले आहे. नुकताच शंभर फुटी रस्त्यावर १२ गॅरेज चालकांवर कारवाई केली आहे असेही त्यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai roads swallowed up by car dealers and garages street car market and repairs ssb